Join us

गणपतीला कोकणवासीयांसाठी बोरिवली मार्गे विशेष गाडी सोडण्यास मान्यता द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 18:31 IST

कोकणातील चाकरमानी आपल्या गावी गणपती उत्सव साजरा करण्यासाठी आवर्जून जातात.

मनोहर कुंभेजकर

मुंबई : पुढच्या महिन्यात दि,22 ऑगस्टला गणपती उत्सव आहे.कोकणातील चाकरमानी आपल्या गावी गणपती उत्सव साजरा करण्यासाठी आवर्जून जातात.यंदा गणेशोत्सवार जरी कोरोनाचे सावट असले तरी,नियमांचे पालन करून कोकणवासीयांसाठी बोरिवली, वसई,दिवा,पनवेल अशी विशेष गाडी सोडण्यात यावी, अशी आग्रही मागणी उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ  शेट्टी यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना केली होती.

कोकण रेल्वे मार्गावर अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी  केंद्रीय रेल्वे मंत्र्या सोबत खासदार गोपाळ शेट्टी यांची व्हर्च्युल बैठक नुकतीच झाली होती.या सूचनेला मान्यता देत जर महाराष्ट्र शासनाने सदर विशेष गाडी सोडण्याची मागणी केल्यास केंद्र सरकारतर्फे गाडी सोडण्यास मान्यता देण्यात येईल असे आश्वासन रेल्वे मंत्र्यांनी यावेळी दिले होते अशी माहिती त्यांनी दिली.

त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणपतीसाठी बोरिवली मार्गे विशेष गाडी सोडण्यास मान्यता द्यावी,अशी आग्रही मागणी खासदार गोपाळ शेट्टी यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केली आहे. जेणेकरून कोकणवासीय मराठी प्रेमी नागरिकांना आपल्या गावी गणेशोत्सव साजरा करता येईल असे देखिल त्यांनी पत्रात नमूद केले आहे.आहे.यासंदर्भात चक्क मराठी भाषेत व्हिडिओ देखिल त्यांनी जारी केला आहे.

या बैठकीत झालेल्या चर्चेप्रमाणे वसई बाय पास व्हाया पनवेल,दिवा,रोहा,महाड,चिपळूण,रत्नागिरी,राजापूर, वैभववाडी,सावंतवाडी, गोवा मार्गे   कर्नाटक,केरळ मार्गे जाणारी कोकण रेल्वे गाडी सोडावी अशी मागणी आपण  2015 पासून केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे सातत्याने केली आहे. त्यामुळे आपली सदर मागणी आता लवकर पूर्णत्वास येणार असून नायगाव जूचंद्र येथे फक्त 7 किमीचे काम बाकी आहे.सदर काम अंतिम टप्यात असून सप्टेंबर पर्यंत पूर्ण होणार झाल्यावर भूमिपूजन करता येईल. त्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक व केरळला जाणाऱ्या प्रवाश्यांना सुखरूप प्रवास करता येईल असा  विश्वास खासदार शेट्टी यांनी शेवटी व्यक्त केला. 

टॅग्स :गणेशोत्सवमुंबईरेल्वे