८६४ घरांचे वाटप पुन्हा लांबणीवर; नायगाव 'बीडीडी' पुनर्वसन प्रकल्पाला महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 12:44 IST2025-12-17T12:43:14+5:302025-12-17T12:44:01+5:30
महापालिका निवडणुकीचीआचारसंहिता लागू झाल्याने त्याचा फटका नायगाव येथील बीडीडी चाळवासीयांना बसला आहे.

८६४ घरांचे वाटप पुन्हा लांबणीवर; नायगाव 'बीडीडी' पुनर्वसन प्रकल्पाला महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका
मुंबई: महापालिका निवडणुकीचीआचारसंहिता लागू झाल्याने त्याचा फटका नायगाव येथील बीडीडी चाळवासीयांना बसला आहे. बीडीडी पुनर्वसन प्रकल्पातील ८६४ घरे तयार असून, त्यांचे चावी वाटप दिवाळीपासून रखडले आहे. आता ते आणखी महिनाभर लांबणीवर गेले. तर, प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील १४ बीडीडी चाळींतील साडेचार हजार मतदार प्रभाग सोडून जाऊ नयेत, यासाठी दुसऱ्या टप्प्याचे कामही रखडले असल्याची चर्चा आहे.
महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक २०० मध्ये नायगाव-बीडीडी चाळींचा समावेश होतो. प्रभाग आरक्षणात हा वॉर्ड 'खुला' झाल्याने येथे सगळेच पक्ष ताकदीचा उमेदवार रिंगणात उतरविण्याची शक्यता आहे. बीडीडी पुनर्वसन प्रकल्पाच्या दुसऱ्या नोव्हेंबरमध्ये सुरुवात होणार होती. प्रत्यक्षात डिसेंबरपासून या इमारती पाहून नव्या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करण्याचे नियोजन असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते.
मागण्यांबाबत अद्याप निर्णय नाही
रहिवाशांनी 'म्हाडा'कडून मिळणाऱ्या घरभाड्यात वाढ आणि वरळीतील बीडीडी चाळीप्रमाणे प्रत्येक फ्लॅटमागे एक पाकिंगची जागा देण्याची मागणी केली.
त्याचबरोबर मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत घर रिकामे करणार नाही, अशी भूमिका रहिवाशांनी घेतली; परंतु यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नाही.
नोव्हेंबरमध्ये कार्यक्रम रद्द
१. पहिल्या टप्प्यातील ८६४ नवी घरे तयार असून, दिवाळीनंतर त्याचे वाटप होईल, अशी अपेक्षा होती. माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात १३ नोव्हेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काही निवडक रहिवाशांना चावी वाटपाचा कार्यक्रम होणार होता.
२. अचानक हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्यानंतर महापालिका निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी होईल, असे अपेक्षित असताना, हिवाळी अधिवेशन संपताच २४ तासांत आचारसंहिता लागू झाल्याने पुन्हा चावी वाटप रखडले आहे.
पहिल्या टप्प्यात आठपैकी पाच इमारती बांधून पूर्ण
एकूण ४२ चाळींचा पुनर्विकास होणार असून, २३ मजल्यांच्या २० इमारती उभारण्यात येणार आहेत.
पहिल्या टप्प्यात आठ, तर दुसऱ्या टप्प्यात १२ इमारती बांधल्या जाणार आहेत. त्यापैकी कंत्राटदार 'एल अॅण्ड टी' कंपनीने पहिल्या टप्प्यातील पाच इमारती बांधल्या असून, ८६४ घरांचा ताबा देणे अपेक्षित आहे. इमारतींना अग्निशमन दलाचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळाले आहे.
दुसरा टप्पाही रखडला
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकल्प यंत्रणा व राजकीय पक्ष थंडावले. दुसऱ्या टप्प्यातील १४ इमारती रिकाम्या केल्यास, मतदार विखुरले जातील आणि मतदानाच्या दिवशी त्यांना प्रभागात आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागेल. त्यामुळे प्रकल्प रखडवल्याची शक्यता नागरिकांनी बोलून दाखवली.