Join us
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 06:33 IST

उल्हासनगरात युती तुटली असून, भाजप सर्व जागा लढवणार आहे. नवी मुंबईत भाजपला युती नको असल्याने बिनसले तर मीरा-भाईंदरमध्येही भाजपने शिंदेसेनेचा हात झिडकारला...

मुंबई/ठाणे : उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारचा अखेरचा दिवस उजाडला तरी सत्ताधारी महायुती व विरोधी महाविकास आघाडीचे सूर जुळत नसल्याचेच चित्र आहे. मुंबई, ठाणे वगळता उल्हासनगर, मीरा-भाईंदर, नवी मुंबईत युती तुटल्यात जमा आहे. ठाण्यात शिंदेसेना ८७ तर भाजपची ४० जागांवर बाेळवण करण्यात आली आहे. उल्हासनगरात युती तुटली असून, भाजप सर्व जागा लढवणार आहे. नवी मुंबईत भाजपला युती नको असल्याने बिनसले तर मीरा-भाईंदरमध्येही भाजपने शिंदेसेनेचा हात झिडकारला. मुंबई महापालिकेत भाजप १३७ तर  शिंदेसेना ९० जागा लढविणार आहे.  काॅंग्रेसने ८७  जागा जाहीर केल्या तर उद्धव - राज यांच्या युतीने नावे जाहीर न करता ए बी फाॅर्म देवून टाकले.  राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष पनवेल वगळता खऱ्या अर्थाने सर्वत्र स्वबळ अजमावत आहे. कल्याण-डोंबिवली, भिवंडी, पनवेल आणि वसई-विरार या महापालिकांत युती होण्याकरिता अनुकूल वातावरण आहे. 

कल्याण-डोंबिवलीत युती झाली की बंडखाेरी हाेणारच  कल्याण-डोंबिवलीत भाजप-शिंदेसेना यांची युती होण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र येथे युती झाल्यास दोन्ही पक्षांत बंडखोरांचे पेव फुटण्याची भीती आहे. हे बंडखोर उद्धवसेना व मनसेच्या वळचणीला जातील ही भीती असल्याने युतीची घोषणा करण्याचे टाळले जात आहे. 

भिवंडीत प्रभाग क्र. १७ वरून युतीचे अडले आहे. येथील उमेदवारांच्या निवडीचे सर्वाधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे यांना दिले. 

पनवेल महापालिकेत भाजपने ७१ जागा स्वीकारून शिंदेसेनेला जेमतेम चार, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला दोन, तर रिपाइंला एक जागा देऊन युती केली. केवळ पनवेलमध्ये अजित पवार युतीत सामावले आहेत. वसई-विरारमध्ये युती होणार असे संकेत प्राप्त होत आहेत.

केडीएमसी, नवी मुंबईत महाविकास आघाडी?; राज-उद्धव युती मात्र स्वतंत्रमहाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी (शरद पवार) हे पक्ष उद्धवसेना व मनसे यांची जवळीक झाल्याने बऱ्याच महापालिकेत दुरावले आहेत. कल्याण-डोंबिवली व नवी मुंबई या महापालिकांत महाविकास आघाडी होण्याचे संकेत प्राप्त होत आहेत. अन्यत्र कुठेही महाविकास आघाडी दिसत नाही. उद्धवसेना व मनसे यांची युती मात्र सर्व महापालिकांत होणार आहे.

येथे युती हाणून पाडल्याची चर्चानवी मुंबईतील मंत्री गणेश नाईक व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संघर्ष गेले काही महिने सुरु आहे. नवी मुंबईत शिंदेसेनेला पाय रोवू द्यायचा नाही, असा चंग बांधलेल्या नाईक यांनी शिंदेसेनेला जेमतेम २० जागा सोडण्याची तयारी दाखविली. शिंदेसेनेने नवी मुंबईत किमान ५० माजी नगरसेवक व मातब्बर इच्छुक आपल्या पक्षात आणल्याने येथे युतीचे सूर जुळणे अशक्यच होते व तेच झाले. मीरा-भाईंदरमध्ये भाजप नेते आमदार नरेंद्र मेहता आणि परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्यात वरचेवर संघर्ष सुरू असतो. मीरा-भाईंदरमध्ये भाजप मजबूत असून, तेथे शिंदेसेनेला वाढू द्यायचे नाही या हेतूने मेहता यांनी युतीचे प्रयत्न हाणून पाडल्याची चर्चा आहे.

ठाण्यात शिल्लक राहिलेल्या चार जागा मुंब्रा विकास आघाडीला देण्यात आल्या असून श्रीरंग आणि नौपाडावरून वाद होता. मात्र तो मिटल्याचे सांगण्यात आले. सोमवारी रात्री ठाण्यातील आनंद आश्रम येथे शिंदेसेना आणि भाजप पदाधिकारी यांच्यात बैठक झाली. आता उमेदवारांची यादी ही पक्षाकडे पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली. चार जागा मुंब्रा विकास आघाडीला देण्यात आल्या आहेत. उल्हासनगरात युतीचे फिस्कटले असून, भाजप स्वबळावर सर्व जागा लढणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Alliance Crumbles in Navi Mumbai, Mira-Bhayandar, Ulhasnagar; Mumbai, Thane United

Web Summary : Alliance fractured in Navi Mumbai, Mira-Bhayandar, Ulhasnagar. Mumbai, Thane remain united. KDMC, Panvel, Vasai-Virar hint at alliance. Factionalism looms in Kalyan-Dombivli despite potential alliance.
टॅग्स :महानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६ठाणे महापालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक २०२६कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक २०२६वसई विरार महानगरपालिका निवडणूक २०२६भाजपाशिवसेनानवी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६