पालिका रुग्णालयात गर्भवती महिलेचा डॉक्टरांअभावी मृत्यू झाल्याचा आरोप, पालिका म्हणते...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 07:36 AM2021-09-30T07:36:58+5:302021-09-30T07:37:26+5:30

मुलुंड येथील २६ वर्षीय सात महिन्यांची गर्भवती महिला २६ सप्टेंबर रोजी पालिकेच्या एम. टी. अगरवाल रुग्णालयात उपचारासाठी आली होती. 

Allegedly a pregnant woman died due to lack of doctors in the municipal hospital, the corporation clarifies pdc | पालिका रुग्णालयात गर्भवती महिलेचा डॉक्टरांअभावी मृत्यू झाल्याचा आरोप, पालिका म्हणते...

पालिका रुग्णालयात गर्भवती महिलेचा डॉक्टरांअभावी मृत्यू झाल्याचा आरोप, पालिका म्हणते...

Next
ठळक मुद्देमुलुंड येथील २६ वर्षीय सात महिन्यांची गर्भवती महिला २६ सप्टेंबर रोजी पालिकेच्या एम. टी. अगरवाल रुग्णालयात उपचारासाठी आली होती. 

मुंबई : मुलुंड येथील पालिका रुग्णालयात गर्भवती महिलेचा डॉक्टरांअभावी मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. मात्र या आरोपाचे पालिका प्रशासनाने खंडन केले आहे. महिलेची प्रकृती खालावत असताना वेळोवेळी नातेवाइकांशी संपर्क करण्यात आला होता, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मुलुंड येथील २६ वर्षीय सात महिन्यांची गर्भवती महिला २६ सप्टेंबर रोजी पालिकेच्या एम. टी. अगरवाल रुग्णालयात उपचारासाठी आली होती. या महिलेला त्याआधी दोन दिवसांपासून ताप होता. त्यानुसार महिलेला रक्त तपासणी करून लक्षणानुसार उपचार करण्याचा सल्ला देण्यात आला होता. मुलुंड येथील प्रसूतिगृहात या महिलेला २७ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले. त्याचबरोबर या महिलेच्या रक्ताचे नमुने चाचण्यांसाठी पाठविण्यात आले.

प्रसूतिगृहात दाखल झाल्यानंतर महिलेचा ताप कमी होऊन तिची प्रकृती स्थिर होती. मात्र त्याच दिवशी रात्री १२ वाजेच्या सुमारास त्या महिलेस पुन्हा एकदा जुलाबाचा त्रास होऊन चक्कर आली. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी या महिलेला पालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर रुग्णालयात हलविले. त्यानंतर तेथून नायर रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला. मात्र तेव्हा नातेवाईक उपस्थित नव्हते. नातेवाईक येईपर्यंत रुग्णाची तब्येत खालावली. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात डॉक्टरांनी आवश्यक ते वैद्यकीय उपचार सुरू केले. मात्र, मध्यरात्री त्या महिलेचा मृत्यू झाला, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

पालिका म्हणे, डॉक्टर उपस्थित...  कर्मचारी म्हणे, डॉक्टर येतच नाहीत!
मुलुंडच्या निशा कसबे या गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी कुटुंबीयांंनी पोलिसांत धाव घेतली आहे. तर दुसरीकडे पालिकेने दिलेल्या माहितीत रुग्णालयात डॉक्टर उपस्थित असल्याचे सांगितले आहे; मात्र प्रत्यक्षात दुपारी चारनंतर डॉक्टर येत नसल्याचे रुग्णालय कर्मचाऱ्यांंनी नमूद केले होते. त्यांचा व्हिडिओही स्थानिक आमदाराने पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविला आहे. त्यामुळे पालिका प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. 

मुलुंडच्या डम्पिंग रोड परिसरात राहणाऱ्या आठ महिन्याच्या गर्भवती निशा हिला सोमवारी पालिकेच्या प्रसूतिगृहात दाखल करण्यात आले होते. सोमवारी रात्री त्यांची प्रकृती बिघडली; मात्र रुग्णालयात डॉक्टर नसल्याने वेळीच योग्य उपचार न मिळाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप पती नितीन कसबे यांनी केला आहे. या घटनेनंतर मंगळवाऱी रात्री पालिकेने मांडलेल्या बाजूमध्ये घटनेदरम्यान रुग्णालयात डॉक्टर उपस्थित असल्याचे सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. 

या घटनेनंतर रुग्णालयात गेलेल्या आमदार मिहिर कोटेजा आणि माध्यम प्रतिनिधीसमोर तेथील कर्मचाऱ्यांंनी दुपारी चारनंतर रुग्णालयात डॉक्टर येत नसल्याचे सांगितले होते. याबाबत वेळोवेळी वरिष्ठांंना सांगितल्याचेही नमूद केले होते. बुधवारी याचा व्हिडिओही पालिकेला पाठवत आमदार आणि निशाचे दीर सचिन कसबे यांनी मुलुंड पोलीस ठाण्यात धाव घेतली. निशाच्या कुटुंबीयांनी पालिकेने मांडलेल्या बाजूवर नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी एडीआर दाखल
मुलुंड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू प्रकरणी नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे. याबाबत योग्य चौकशी करण्यात येत असल्याचे मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय भिसे यांनी सांगितले. तसेच पोलिसांनी कुटुंबीयांकडून पैसे मागितल्याचा आरोपही त्यांनी फेटाळला आहे.

Web Title: Allegedly a pregnant woman died due to lack of doctors in the municipal hospital, the corporation clarifies pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.