Join us  

मुंबई मनपातील कथित घोटाळे पुन्हा रडारवर! एसआयटी चौकशीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2023 7:49 AM

मुंबई महापालिकेतील कथित घोटाळ्याचा विषय भाजपने पुन्हा एकदा अजेंड्यावर घेतला आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेतील कथित घोटाळ्याचा विषय भाजपने पुन्हा एकदा अजेंड्यावर घेतला आहे. विविध कामांमध्ये नोव्हेंबर २०१९ ते ऑक्टोबर २०२२ या काळात झालेल्या १२ हजार कोटींच्या कामात निधीचा गैरव्यवहार, कंत्राट देताना नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका ‘कॅग’ने ठेवला असून या प्रकरणांची विशेष चौकशी पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करावी व एफआयआर दाखल करावा अशी मागणी करणारे पत्र भाजपचे आ. अमित साटम यांनी मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे. विधिमंडळाच्या  अधिवेशनात कॅगचा अहवाल सादर झाला होता व त्यावर आरोप-प्रत्यारोपदेखील झाले पण राज्य सरकारने कोणतीही चौकशी नेमली नव्हती. मात्र साटम यांच्या पत्रानंतर चौकशी होण्याची शक्यता आहे.   

साटम पत्र परिषदेत म्हणाले की, नोव्हेंबर २०१९ ते ऑक्टोबर २०२२ या काळात झालेल्या सुमारे १२ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेच्या कामांचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांमार्फत (कॅग) लेखा परीक्षण करण्यात आले. यात ३ हजार कोटींची कामे कोरोनासंबंधित होती. या लेखापरीक्षणात ‘कॅग’ने अनेक कामांमध्ये  सार्वजनिक निधीचा गैरव्यवहार, अधिकारांचा गैरवापर, शासकीय नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे निरीक्षण नोंदवले आहे, असा दावा आ. साटम यांनी केला. 

२१४ कोटींपेक्षा अधिक रकमेचा गैरव्यवहार?  नोव्हेंबर २०१९ ते जून २०२२ या काळात महापालिकेने २१४ कोटींपेक्षा अधिक रकमेच्या कामांचे, निविदा न मागवताच वाटप केले. ४ हजार ७५६ कोटींची कामे ६४ कंत्राटदारांना देताना त्यांच्याबरोबर करारच करण्यात आला नव्हता.  करार न केल्यामुळे महापालिकेला कंत्राटदारांविरुद्ध कायदेशीर कारवाईच करता येत नाही. ३,३५६ कोटींच्या १३ कामांत थर्ड पार्टी ऑडिटर नियुक्त करण्यात आला नव्हता, असेही आ. साटम यांनी सांगितले.  या प्रकरणाची चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील एसआयटीमार्फत करावी असे ते म्हणाले.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाएकनाथ शिंदेमुख्यमंत्री