Join us  

आकाशात आज भगवा धनुष्य दिसेल, आजच्या सभेत योग्य उपचार होतील, संजय राऊतांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 5:05 PM

भोंगा, हनुमान चालीसा, हिंदुत्व, आणि भ्रष्टाचार अशा विविध मुद्द्यांवर बोलण्यासाठी उद्धव ठाकरे सज्ज झाले आहेत.

मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज सभा, वांद्रे पूर्व येथेल बीकेसी मैदानात जाहीर सभा होणार आहे. आजच्या सभेत मुख्यमंत्री ठाकरे कुणाचा समाचार घेणार? याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान या सभेला उपस्थित राहण्यासाठी राज्याच्या विविध भागातून शिवसेना कार्यकर्ते येणार आहेत.

भोंगा, हनुमान चालीसा, हिंदुत्व, आणि भ्रष्टाचार अशा विविध मुद्द्यांवर बोलण्यासाठी उद्धव ठाकरे सज्ज झाले आहेत. एक ना अनेक मुद्द्यांवरुन गेले काही दिवस राज्याचे राजकारण चांगलंच तापलेलं आहे. गेल्या दोन महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भोंग्यांचा मुद्दा घेत महाविकास आघाडी आणि खास करुन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. यावर आज उद्धव ठाकरे काय बोलतील याकडे लक्ष लागून आहे.

उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत विरोधकांना इशारा दिला आहे. महाराष्ट्राचा देशाचा राजकीय वातावरण आणि या वातावरणावरती आलेलं मळभ, दुःख, गढूळपणा हा आजच्या सभेने दूर होईल. महाराष्ट्राचा आकाश निरभ्र होईल आणि या आकाशात भगवा धनुष्य दिसेल. पोटदुखी, जळजळ असणाऱ्यांवर आजच्या सभेत योग्य उपचार केले जातील, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

उद्धव ठाकरे राज्याचा दौरा करणार-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यभरात फिरतील. लोकांच्या समस्या जाणून घेतील. शेतकरी आणि कष्टकऱ्यांसी संवाद साधतील. त्यासाठी विभागवार नियोजन सुरू असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिली. आजच्या सभेनंतर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली. आमदारांच्या बैठकादेखील सुरू आहे. जूनमध्ये शिवसेनेचा स्थापना दिन आहे. त्यावेळी संभाजीनगरात (औरंगाबाद) महामेळाव्याचं आयोजन करण्यात येईल, असंही राऊत यांनी सांगितलं.

टॅग्स :उद्धव ठाकरेसंजय राऊतशरद पवारशिवसेना