बविआ वगळता सर्वच पक्षांत सामसूम
By Admin | Updated: May 19, 2015 23:17 IST2015-05-19T23:17:07+5:302015-05-19T23:17:07+5:30
२०१० मध्ये झालेल्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी बहुजन विकास आघाडीला कौल दिला. दुसऱ्या क्रमांकावर लोकहितवादी लिडर पार्टी होती.

बविआ वगळता सर्वच पक्षांत सामसूम
दिपक मोहिते ल्ल वसई
२०१० मध्ये झालेल्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी बहुजन विकास आघाडीला कौल दिला. दुसऱ्या क्रमांकावर लोकहितवादी लिडर पार्टी होती. यावर्षी ती रणांगणात उतरण्याची शक्यता कमी आहे. गेल्यावेळी झालेल्या लढतीचे चित्र लक्षात घेता बहुजन विकास आघाडीची लढत सेना-भाजप युतीशीच होण्याची शक्यता आहे.
गेल्या निवडणुकीच्या वेळी अनेक पक्षातील असंतुष्ट पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीसाठी लोकहितवादी लिडर पार्टीचा पर्याय स्वीकारला होता. तिच्या तिकिटावर निवडून आलेले अनेक उमेदवार आता स्वगृही परतत आहेत. या खेळीमध्ये त्यांना काही प्रमाणात यश देखील मिळाले. परंतु ५ वर्षात राजकीय पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेले. ज्यांनी या पार्टीचा पर्याय येथील मतदारांसमोर ठेवला होता ते नेतृत्व काळाच्या ओघात नाहीसे झाले. त्यामुळे अनेकजण आता आपल्या पूर्वाश्रमीच्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. अशा उमेदवारांच्या प्रयत्नामुळे प्रामाणिकपणे जे कार्यकर्ते आपल्या पक्षासमवेत राहिले त्यांच्यामध्ये नाराजीचे वातावरण आहे. जे नगरसेवक घरवापसी करू पाहत आहेत त्यांना तिकिटे देऊ नये, असा एक मतप्रवाह असून हा तिढा ज्येष्ठ नेते कसे सोडवतात यावर बंडखोरीचे प्रमाण अवलंबून असेल. गेल्या निवडणुकीत अनेक राजकीय पक्षासमवेत स्थानिक पातळीवरील आघाड्याही निवडणूक रिंगणात होत्या. ८९ प्रभागातील लढतीचे चित्र लक्षात घेता यंदा बहुजन विकास आघाडीला तीव्र संघर्षाला सामोरे जावे लागणार नाही, असे चित्र आहे.
मतदान घटणार?
मतदारांची संख्या वाढली असली तरी, उन्हाळी सुट्ट्या व मतदारांचे गावी जाणे या दोन बाबींमुळे मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता आहे. गेल्या खेपेस अनेक प्रभागात तिरंगी, चौरंगी व काही प्रभागात पंचरंगी लढती झाल्या. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.
अशा झाल्या लढती
प्रभाग क्र. ९ मध्ये ४ हजार ५०० मतदान झाले होते. त्यापैकी सर्वाधिक मते २९८१ लोकहितवादी लिडर पार्टीच्या ज्योती ठाकूर यांना मिळाले होते. तर प्रतिस्पर्धी बहुजन विकास आघाडीच्या सुरेखा पाटील यांना केवळ ७७० मतांवर समाधान मानावे लागले. या लढतीत ठाकूर यांनी पाटील यांचा २ हजार २११ मतांनी पराभव केला. तर प्रभाग क्र. ३९ मध्ये एकूण ६ हजार ८२० मतापैकी केवळ २०४० जणांनी आपल्या मताचा अधिकार वापरला. येथे झालेल्या लढतीत बहुजन विकास आघाडीच्या मुनीर खान यांना ९०९ मते मिळाली तर, भाजपाचे सुभाष साटम यांना ८५१ मते मिळाली. साटम यांचा केवळ ५८ मतांनी पराभव झाला. हे दोन प्रभाग वगळता अन्य ८७ प्रभागात सरासरी मतदान झाले. यावेळी काही किरकोळ अपवाद वगळता राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३१ उमेदवारांना शंभरीही गाठता आली नाही.
या निवडणुकीपूर्वी महानगरपालिकेतील गावांच्या प्रश्नावरून रणकंदन माजले होते. त्यामुळे ग्रामीण भागातील यासर्व प्रभागामध्ये मतदारांच्या नाराजीचा फटका बहुजन विकास आघाडीला बसला. परंतु गेल्या ५ वर्षात महानगरपालिकेकडून ग्रामीण भागात झालेली विकासकामे लक्षात घेऊन ग्रामस्थांचा विरोध आता मावळला आहे. त्याचबरोबर गेल्या निवडणुकीमध्ये झालेल्या अपप्रचारामुळे मतदारांची दिशाभूल झाली त्यामुळे विरोधकांना अपेक्षा नसतानाही मोठ्या संख्येने जागा जिंकता आल्या. परंतु यंदा महानगरपालिकेने केलेली विकासकामे प्रचाराच्या केंद्रस्थानी असेल. महानगरपालिकेच्या एकुण जागांमध्ये २६ ने वाढ झाल्याने इच्छुकांच्या संख्येतही वाढ झाली आहे.
बहुजन विकास आघाडीच्या विरारस्थित कार्यालयाला रोज जत्रेचे स्वरुप येत असते. इच्छुकांच्या वाढत्या संख्येमुळे बविआच्या वरिष्ठ नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. दुसरीकडे सेना व भाजप या दोन्ही पक्षामध्ये जागावाटपासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण देखील बहुजन विकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे काँग्रेस सुत्राकडून सांगण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात मात्र अद्याप स्मशानशांतता आहे. तिकिट मागण्यासाठी इच्छुकच पुढे येत नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणूक लढवण्याची शक्यता फार कमी आहे. गेल्या निवडणुकीत पक्षाची झालेली वाताहात लक्षात घेऊन कार्यकर्तेही पक्षाकडे तिकिट मागण्यास धजावत नाहीत. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रीयेपासून राष्ट्रवादी काँग्रेस लांब राहण्याची शक्यता अधिक आहे.