Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेशापासून निकालापर्यंत सर्व प्रक्रिया सिंगल विंडोतून, नव्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणीचा मानस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 12:41 IST

सोमवारी झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय सभेमध्ये विद्यापीठ प्रशासनाकडून विद्यार्थी सुविधांवर भर देणारा अर्थसंकल्प जाहीर करण्याचा प्रयत्न केला.

मुंबई : मुंबई विद्यापीठाचा परिसर पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, ठाणे अशा व्यापक परिसरात पसरला असून, महाविद्यालयांची संख्या ८६० झाली आहे. विद्यापीठाच्या दूरवरच्या विद्यार्थ्यांसाठी उपकेंद्राची सोय असली तरी परीक्षा विभागाशी निगडित अनेक अडचणींसाठी, तक्रारी आणि प्रक्रियांसाठी विद्यार्थ्यांना थेट विद्यापीठच गाठावे लागते.

महाविद्यालय स्तरावर मदत न मिळाल्याने त्रस्त विद्यार्थ्यांना अनेकदा कलिना संकुलापर्यंतच्या फेऱ्या माराव्या लागतात. दरम्यान, प्रवेशापासून ते निकालापर्यंत सर्व प्रक्रिया सिंगल विंडोमधून पार पाडली जावी आणि तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना होणारा नाहक त्रास वाचावा, वेळ वाया जाऊ नये यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून ही प्रणाली कार्यान्वित होणार आहे.

सोमवारी झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय सभेमध्ये विद्यापीठ प्रशासनाकडून विद्यार्थी सुविधांवर भर देणारा अर्थसंकल्प जाहीर करण्याचा प्रयत्न केला. नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये सिंगल विंडो सिस्टिमचा समावेश करण्यात आला आहे. सिंगल विंडो सुविधा आतापर्यंत विद्यापीठात केवळ परदेशी विद्यार्थ्यांच्या विद्यापीठांतर्गत होणाऱ्या महाविद्यालयीन प्रवेशासाठी होती. अभ्यासक्रम, प्रवेशापासून ते निकालापर्यंतच्या अडचणी, पुनर्मूल्यांकनासारख्या प्रक्रिया विद्यार्थ्यांना लॉगिनमधूनच करता येणार आहेत. 

एमकेसीएसला सक्षम पर्याय उभा करणारअनेक वर्षांपासून मुंबई विद्यापीठाचे निकाल, परीक्षा आणि इतर अनेक तंत्रज्ञानावर आधारित कामे एमकेसीएल पाहत आहे. मात्र वेळोवेळी एमकेसीएलच्या तांत्रिक अडचणी, समस्यांमुळे विद्यापीठाला विद्यार्थी, पालकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. दरम्यान, एमकेसीएलला सक्षम अशा पर्यायाची उभारणी विद्यापीठ प्रशासन करीत असल्याची माहिती अर्थसंकल्पादरम्यान दिली.

डिजिटल विद्यापीठासाठी तरतूदयंदाच्या अर्थसंकल्पात डिजिटल विद्यापीठासाठी ३५ कोटींची तरतूद केली आहे. विद्यापीठातील शिक्षण ऑफलाइन असले तरी त्यासंबंधित कामकाज व प्रशासकीय कामकाज ऑनलाइन पद्धतीने चालविण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. यामुळे विद्यापीठातील कामांना गती तर येईलच मात्र प्रत्येक कामाचे ट्रॅकिंग आणि सुपरव्हिजन करणे सहज होणार आहे.

टॅग्स :शिक्षण