लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : औरंगजेबाबाबत चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. त्यांनी अनेक मंदिरे बांधली. बनारसमध्ये पंडिताच्या मुलीबरोबर लग्न करू इच्छिणाऱ्या आपल्या सरदाराला हत्तीच्या पायी दिले. त्यामुळे पंडितांनी तिथे त्यांच्यासाठी मशीद बनवली. औरंगजेबाला मी क्रूर शासक मानत नाही. त्यावेळी हिंदू-मुस्लिम लढाई नव्हती, ती राज्य निर्माण करण्यासाठी लढाई होती. औरंगजेबाच्या सैन्यात हिंदू होते, शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम होते. औरंगजेबाच्या काळात भारत सधन होता, असे वादग्रस्त विधान समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी केले आहे.
आझमी यांच्या या वादग्रस्त विधानाचा सर्वपक्षीय नेत्यांनी समाचार घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अबू आझमींवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, असे म्हटले आहे. दरम्यान शिंदेसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी दिलेल्या तक्रारीवरून ठाणे पोलिसांत आझमी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
अबू आझमींकडून यापूर्वीही औरंगजेबाचे समर्थन
अबू आझमी यांनी औरंगजेबाचे समर्थन करण्याची ही काही पहिली वेळ नाही. २०२३ मध्ये औरंगजेबाला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी कुलाबा पोलिसांत एफआयआर दाखल केला होता.
खटला चालवायला हवा पण कोण चालवणार?
आझमी यांनी औरंगजेबाचे कौतुक करुन महाराजांचा अपमान आहे. त्यांच्यावर खटला चालायला हवा. पण तो कधी चालणार? कारण इथे भाजप सरकार आहे, अशी टीका आ. आदित्य ठाकरे यांनी केली. भाजप नेते राम कदम म्हणाले की, अबू आझमी यांनी इतिहास वाचलाच पाहिजे. असे वक्तव्य करताना त्यांना लाज वाटली पाहिजे.