सर्वच पक्षांचे शक्तिप्रदर्शन, मिरवणूक काढून भरले उमेदवारी अर्ज; उद्धवसेना-शिंदेसेनेत चढाओढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 15:38 IST2025-12-31T15:37:10+5:302025-12-31T15:38:47+5:30
भगवे झेंडे, भगवे उपरणे, पक्ष चिन्ह असलेल्या प्रतिमा, ढोल-ताशांच्या गजरात अनेक उमेदवार निवडणूक कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी आले. शहर भागात उद्धवसेना आणि शिंदेसेनेत शक्तिप्रदर्शनाचा जोर, तर उपनगरात भाजप कार्यकर्त्यांचा जोश होता.

सर्वच पक्षांचे शक्तिप्रदर्शन, मिरवणूक काढून भरले उमेदवारी अर्ज; उद्धवसेना-शिंदेसेनेत चढाओढ
मुंबई : उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी, मंगळवारी सर्वच राजकीय पक्षांच्या विशेषतः शिंदेसेना आणि उद्धवसेनेच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले.
भगवे झेंडे, भगवे उपरणे, पक्ष चिन्ह असलेल्या प्रतिमा, ढोल-ताशांच्या गजरात अनेक उमेदवार निवडणूक कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी आले. शहर भागात उद्धवसेना आणि शिंदेसेनेत शक्तिप्रदर्शनाचा जोर, तर उपनगरात भाजप कार्यकर्त्यांचा जोश होता.
उद्धवसेनेचे प्रभाग क्रमांक २०४ मधील उमेदवार किरण तावडे शक्तिप्रदर्शन करत परळ-भोईवाडा महापालिका शाळेतील निवडणूक कार्यालयात आले. वंचित बहुजन आघाडीशी युती झाल्याने काँग्रेस उमेदवारांमध्येही उत्साह दिसत होता. उद्धवसेनेच्या उमेदवारांना ‘मनसे’चे कार्यकर्ते साथ देत असल्याचे चित्र होते.
मुंबईतील सर्व निवडणूक कार्यालयाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, तर कार्यालयापासून १०० मीटरवर बॅरिकेड्स लावण्यात आले होते.
रात्री पक्षप्रवेश, सकाळी उमेदवारी
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर यांनी सोमवारी रात्री शिंदेसेनेत प्रवेश केला. मंगळवारी सकाळी त्यांना दादर पश्चिमेकडील प्रभाग क्रमांक १९२ मधून शिंदेसेनेने उमेदवारी दिली. त्यांनी फटाके फोडत, ढोल-ताशांच्या गजरात अर्ज दाखल केला. त्यापूर्वी, त्यांनी पोर्तुगीज चर्चजवळ प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. या प्रभागात त्यांची लढत मनसेचे यशवंत किल्लेदार यांच्याशी होणार आहे. तर माझगाव येथील प्रभाग २०९ मधून शिंदेसेनेचे यशवंत जाधव यांनीही मिरवणूक काढत नागपाड्यातील निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला.
खाण्याची चंगळ, तर काही ठिकाणी आबाळ
उमेदवारांसह आलेल्या कार्यकर्त्यांची काही ठिकाणी चंगळ झाली, तर काही ठिकाणी आबाळ झाली. काहींनी कार्यकर्त्यांसाठी चक्क बिर्याणी, तर काहींनी वडापाव, पाणी, थंड पेये, अशी व्यवस्था केली होती. काहींनी खाण्यापिण्यासाठी कुपन देऊन त्यांची व्यवस्था केली. मात्र, काही उमेदवारांसोबत असलेल्या कार्यकर्त्यांना दुपारी उशिरापर्यंत काहीच खायला न मिळाल्याने त्यांची आबाळ झाली.
काही उमेदवारांनी त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांची चांगली काळजी घेतली. सकाळी ८ वाजल्यापासून काही कार्यकर्ते उमेदवारांसोबत होते. त्यामुळे त्यांना नाष्टा म्हणून वडापाव, मसाला डोसा, सँडविच अशा पदार्थांची मेजवानीच देण्यात आली. काही उमेदवारांनी निवडणूक कार्यालयाजवळ वाहनातून नाष्टा सोबत आणल्याचे पाहायला मिळाले.