Join us  

राज्यात अतिदक्षतेचा इशारा; राष्ट्रपती राजवटीमुळे विशेष सुरक्षा व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 7:28 PM

समाजकंटकांवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई: राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे घातपाती कृत्य किंवा अनुचित प्रकार घडण्याच्या शक्यतेमुळे पोलिसांनी पुर्णपणे खबरदारी बाळगण्याची सूचना केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने केलीआहे. त्यामुळे अयोध्या बाबरी मशीद खटला निकालाच्या पाश्वभूमीवर राज्यात तैनात पोलीस बंदोबस्त काही प्रमाणात अद्यापही कायम ठेवण्यात आला आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. विविध राजकीय पक्ष, संघटना आणि त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हालचालीवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.

कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत.अयोध्या खटल्याच्या पाश्वभूमीवर राज्यात गेल्या आठवड्याभरापासून कडकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. निकालानंतर कोणतीही अनुचित प्रकार न घडल्याने पोलिसांनी समाधानाचा सुस्कारा सोडला. मात्र विधानसभा निवडणूकीचा निकालाला ३ आठवडे उलटूनही अद्याप नवीन सरकार अस्तित्वात आलेली नाही.

तसेच मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काळजीवाहू सरकारकडून कार्यभार चालविला जात आहे. मात्र नवीन सरकार स्थापन करण्यास भाजपाबरोबर अन्य सेना व कॉँग्रेस आघाडीला यश मिळालेले नाही. त्यामुळे राजकीय अस्थिरता कायम राहिली आहे, त्याचा फायदा समाजकंटक व देशद्रोही संघटनाकडून होण्याची शक्यता असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जावू शकतो, त्यामुळे योग्य ती खबरदारी बाळगण्यात यावी, महत्वाची शहर, ठिकाणे, गर्दीच्या स्थळी विशेष सुरक्षा तैनात करण्यात यावी, अशा सूचना तपास यंत्रणांनी दिलेल्या आहेत. त्यानुसार आयोध्या खटल्याच्या निकालावेळी लावलेला बंदोबस्त शिथील केला असलातरी आणखी काही दिवस त्यादृष्टिने नियोजन करावे, असे आदेश पोलीस महासंचालकांनी दिले आहेत.

टॅग्स :राष्ट्रपती राजवटमहाराष्ट्रनिवडणूकदेवेंद्र फडणवीसगुन्हेगारी