'अलबत्या गलबत्या'चे एकाच दिवशी सहा प्रयोग, स्वातंत्र्यदिनी करणार 'शुद्ध बीजापोटी' नाटकाच्या विक्रमाशी बरोबरी
By संजय घावरे | Updated: July 29, 2024 19:18 IST2024-07-29T19:15:55+5:302024-07-29T19:18:17+5:30
Albatya Galbatya Marathi Natak: मागील बऱ्याच वर्षांपासून बच्चे कंपनींसह मोठ्यांच्याही मनावर अधिराज्य गाजवणारी चींची चेटकीण आणि 'अलबत्या गलबत्या' हे नाटक नवा विक्रम करण्यासाठी सज्ज झाले आहे. स्वातंत्र्यदिनी या नाटकाचे सलग सहा प्रयोग सादर केले जाणार आहेत.

'अलबत्या गलबत्या'चे एकाच दिवशी सहा प्रयोग, स्वातंत्र्यदिनी करणार 'शुद्ध बीजापोटी' नाटकाच्या विक्रमाशी बरोबरी
मुंबई - मागील बऱ्याच वर्षांपासून बच्चे कंपनींसह मोठ्यांच्याही मनावर अधिराज्य गाजवणारी चींची चेटकीण आणि 'अलबत्या गलबत्या' हे नाटक नवा विक्रम करण्यासाठी सज्ज झाले आहे. स्वातंत्र्यदिनी या नाटकाचे सलग सहा प्रयोग सादर केले जाणार आहेत.
३० नोव्हेंबर २००८ रोजी प्रेमानंद गज्वी लिखित आणि राम दौंड दिग्दर्शित 'शुद्ध बीजापोटी' या नाटकाचे रवींद्र नाट्य मंदिरमध्ये सलग सहा प्रयोग झाले होते. या नाटकात डॉ. गिरिश ओक यांच्यासह सुप्रिया नंदकिशोर, स्नेहल कुलकर्णी, महेश जोशी, रमेश भिडे, राजेश मालवणकर आदी कलाकारांच्या भूमिका होत्या. त्यामुळे एकाच दिवशी सलग सहा प्रयोग करण्याचा विक्रम मराठी रंगभूमीसाठी नवीन नाही. आता रत्नाकर मतकरी लिखित आणि चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित 'अलबत्या गलबत्या' हे नाटक या विक्रमाला गवसणी घालण्यासाठी सज्ज झाले आहे. १५ ऑगस्ट रोजी दादर येथील श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहामध्ये सकाळी ७:१५ वाजता 'अलबत्या गलबत्या'चा पहिला प्रयोग सादर होणार आहे. त्यानंतर सकाळी ९:४५, दुपारी १२ वाजता, दुपारी ३ वाजता, सायंकाळी ५:३० वाजता आणि रात्री ८ वाजता असे सलग सहा प्रयोग होतील. या दरम्यान वेळेचे अचूक गणित साधत कलाकार-तंत्रज्ञांची एनर्जी शेवटपर्यंत टिकवण्याचे आव्हान 'अलबत्या गलबत्या'च्या टिमसमोर राहणार आहे. झी मराठीची प्रस्तुती असलेल्या या नाटकाचे निर्माते राहुल भंडारे आहेत. प्रमुख भूमिकेत सनीभुषण मुणगेकर, श्रद्धा हांडे असून, चेटकिणीच्या भूमिकेत निलेश गोपनारायण आहे. सुनील पानकर आणि गोट्या सावंत या नाटकाचे सुत्रधार आहेत.