महेश पवार, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : जानेवारी ते मे २०२५ या पाच महिन्यांत बालकांवरील अत्याचाराच्या दाखल गुन्ह्यांत वाढ झाली असून, राज्यभरात या कालावधीत १०,६६२ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. २०२४ मध्ये वर्षभरात २२,५७८ गुन्हे दाखल झाले होते. तेथे या वर्षी पाच महिन्यांतच हे प्रमाण ५० टक्क्यांच्या जवळ गेले आहे. तर, महिलांवर अत्याचार प्रकरणी २०२४ मध्ये ४,४६७ गुन्हे दाखल झाले होते. मात्र, गत पाच महिन्यांत ३,५०६ गुन्हे दाखल झाले आहेत. हे प्रमाण ७० टक्क्यांच्या पुढे गेले असून गुन्हेगारीचे वाढते प्रमाण चिंताजनक ठरले आहे.
राज्यात महिला, बालकांवरील अत्याचार, खून, बलात्कार, चोरी, दरोडे व सायबर असे विविध १ लाख ६० हजारांहून अधिक गुन्हे गेल्या पाच महिन्यांत दाखल झाले आहेत. यात बलात्काराचे ३,५०६, खुनाचे ९२४, चोरी सुमारे ३०,००० आणि दरोड्याच्या १५६ गुन्ह्यांचा समावेश आहे, याबाबत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गृह विभागाला जाब विचारण्यात आला होता. त्यावर गुन्ह्यांत वाढ होत असली तरी पोलिसांच्या व न्यायव्यवस्थेच्या सक्रियतेमुळे अनेक प्रकरणांवरील निर्णय जलदगतीने घेण्यात आले, असे विभागाने यावेळी स्पष्ट केले होते.
न्याय व तपास प्रक्रियेत आला वेग
महिला अत्याचार प्रकरणांतील ९१% आरोपींना अटक झाली आहे. ‘पॉक्सो’ व महिला अत्याचार प्रकरणांसाठी सध्या २० पॉक्सो आणि १२ जलदगती विशेष न्यायालय सुरू आहेत. त्यामुळे ६० दिवसांत निर्णय प्रक्रिया पूर्ण होण्याचे प्रमाण ९७.३% पर्यंत पोहोचले आहे. आर्थिक फसवणुकीप्रकरणी परत मिळणाऱ्या रकमेचे प्रमाण २०.७५% वरून ६१% पर्यंत वाढले आहे. पोलिसांच्या कार्यक्षमतेत वाढ झाल्याचा दावा करतानाच न्यायालयीन व्यवस्था, पोलिस तपास व सायबर सुरक्षेत झालेल्या सुधारणांमुळे भविष्यात गुन्ह्यांचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा गृहविभागाने व्यक्त केली आहे.