मनोज गडनीस -
मुंबई : गेल्या दोन वर्षांमध्ये बॉलिवूडमधील अनेक कलावंतांनी मुंबईत ५५० कोटींची निवासी आणि कार्यालयीन मालमत्ता खरेदी केलेली असताना बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांनी गेल्या सात महिन्यांमध्ये त्यांच्या मालकीच्या ११० कोटी रुपयांच्या मालमत्तांची विक्री केली. त्यामुळे बॉलिवूडमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. कर भरणा करणाऱ्यांमध्ये बॉलिवूडमध्ये पहिल्या पाचमध्ये असलेल्या अक्षय कुमार याला अचानक मालमत्ता का विकाव्या लागत आहेत, याची कुतूहलपूर्ण चर्चा बॉलिवूडमध्ये सध्या रंगत आहे. प्राप्त माहितीनुसार, अक्षयकुमार याने बोरिवली, वरळी आणि लोअर परळ येथील त्याच्या काही निवासस्थानांची तसेच कार्यालयीन मालमत्तांची विक्री केली आहे.
कुठे किती रुपयांना विक्री केली?बोरिवलीत ३ बीएचके फ्लॅटची विक्री ४.३५ कोटींना : बोरिवली येथील १०७३ चौरस फूट आकारमानाच्या फ्लॅटची विक्री त्यांनी ४ कोटी २५ लाख रुपयांना केली. हा फ्लॅट त्यांनी २०१७ यावर्षी २ कोटी ३८ लाख रुपयांना खरेदी केला होता. या विक्रीद्वारे त्यांना ७८ टक्के नफा झाला आहे. वरळीत ८० कोटींना फ्लॅटची विक्री : अक्षय कुमार आणि त्यांची पत्नी व अभिनेत्री ट्विंकल खन्ना यांच्या नावे वरळीतील ओबेरॉय थ्री सिक्टी या आलिशान इमारतीमध्ये असलेला ६८३० चौरस फूट आकारमानाचा विस्तीर्ण फ्लॅट त्यांनी ३१ जानेवारी २०२५ रोजी ८० कोटी रुपयांना विकला.बोरिवली पूर्वेतील फ्लॅट विकला ४.३५ कोटींना : बोरिवली पूर्वेतील १०७३ चौरस फुटांच्या तीन बीएचके फ्लॅटची विक्री मार्च महिन्यात ४ कोटी ३५ लाख रुपयांना केली. या फ्लॅटच्या विक्रीद्वारे त्यांना ८४ टक्के नफा झाला.बोरिवलीतील आणखी एक फ्लॅटची विक्री ६.६० कोटींना : मार्च महिन्यातच बोरिवली येथील आणखी एका फ्लॅटची विक्री ६ कोटी ६० लाख रुपयांना केली. हा फ्लॅट २०१७ यावर्षी खरेदी केला होता. या विक्री व्यवहारात त्यांना ८९ टक्के नफा झाला.लोअर परळचे कार्यालय ८ कोटींना विकले : लोअर परळ येथे २०२० यावर्षी खरेदी केलेल्या कार्यालयाची विक्री अक्षय कुमार याने एप्रिल महिन्यात ८ कोटी रुपयांना केली. हे कार्यालय त्याने ४ कोटी ८५ लाख रुपयांना खरेदी केले होते.पुन्हा बोरिवलीतील फ्लॅटची विक्री : अक्षय कुमार याचे बोरिवलीवर विशेष प्रेम असावे. कारण त्याने बोरिवलीमधील आणखी एक तीन बीएचके फ्लॅट २०१७ मध्ये ३ कोटी ६९ लाख रुपयांना खरेदी केला होता. त्याची विक्री १६ जुलै रोजी ७ कोटी १० लाख रुपयांना केली.