रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 16:44 IST2025-09-08T16:36:21+5:302025-09-08T16:44:26+5:30

लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकारी मंडळावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने केली आहे.

Akhil Maharashtra Fishermen Action Committee demands filing of criminal cases against the executive board of Lalbaghcha Raja Ganeshotsav Mandal | रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!

रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!

Lalbaghcha Raja: नवसावाला पावणारा अशी जगभरात ओळख असलेल्या लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. तब्बल ३६ तासानंतर लालबागच्या राजाचे विसर्जन पूर्ण झालं. भरतीमुळे लालबागच्या राजाची मूर्ती तराफ्यावर न येऊ शकल्याने बराच वेळ विसर्जन रखडलं होतं. अखेर ओहोटी सुरु झाल्यानंतर गणपतीची मूर्ती तराफ्यावर घेऊन विसर्जित करण्यात आली. मात्र लालबागच्या राजाचे विसर्जन वेळेत न झाल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे. अशातच अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने लालबागच्या कार्यकारी मंडळावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

शनिवारी सकाळी १० वाजता सुरु झालेली लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक रविवावर संध्याकाळपर्यंत चौपाटीवर रखडली होती. रविवारी रात्री ९.१० वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले. यावरुन कोळी बांधवांनी नाराजी व्यक्त केली आहे. लालबागच्या राजाचे विसर्जन चंद्र ग्रहणात केल्याने हिंदू धार्मिक्यांचे भावना दुखावल्या असून भाविकांचा दर्शनच्यावेळी मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आल्याची तक्रार मच्छिमार समितीने केली आहे. मच्छिमार समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

"लालबागच्या राज्याचे विसर्जन प्रक्रियेत झालेल्या घोळामुळे बाप्पांचे विसर्जन चंद्र ग्रहण सुरु असताना झाल्याने लाखो गणेश भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना शारीरिक आणि मानसिक छळ सुरु आहे. असे प्रकार भविष्यात घडू नये यासाठी मंडळातील कार्यकारी समितीतील सदस्यांची चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. लालबागच्या राज्याची लोकप्रियता वाढल्यानंतर मंडळातील कार्यकारिणीतील सदस्यांनी संपूर्ण उत्सवाचे बाजारीकरण करणे सुरु केले. सामान्य भाविकांमुळे मंडळाला प्रसिद्धी आणि अफाट पैसा मिळू लागला, त्याच भाविकांची अवहेलना करण्याचा प्रताप मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून होऊ लागला. एका सामान्य बापाच्या चिमुकल्या मुलीचा शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याचा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्व भाविकांच्या सहनशीलतेचा अंत आता झाल्यामुळे या अमानवी घटना भविष्यात घडू नये यासाठी तक्रार केली आहे," असं देवेंद्र तांडेल यांनी म्हटलं.
 
"वर्षानुवर्षे विसर्जन सोहळा हा मुंबईतला कोळी बांधव करत आलेला आहे. यावर्षी पहिल्यांदाच कोळी बांधवांना डावलून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विसर्जन घडवून आणण्याच्या प्रयत्नात अपयश झाल्याचे दिसून आले. विसर्जन चंद्र ग्रहणात करणे हा फक्त बाप्पांचा अपमान नसून तो समस्त कोळी समुद्राचा आणि लाखो हिंदू भाविकांचा अपमान आहे. त्यामुळे घडलेल्या प्रकारची सखोल चौकशी करून दोषी गुन्हेगारांवर फौजदारी कारवाई करावी," असंही तांडेल यांनी म्हटलं.

लालबागच्या राजाच्या दर्शन प्रक्रियेत तातडीने बदल करण्यातहे यावेच. दर्शनासाठी होणारी अफाट गर्दी आणि व्हीआयपी संस्कृतीला आटोक्यात आणण्याकरिता दर्शन प्रक्रियेमध्ये बदल करून व्हीआयपी दर्शनासाठी फक्त एक दिवस देणे तसेच चेंगराचेंगरीचा प्रकार घडू नये म्हणून देखाव्याचे पंडाल बंधिस्त अवस्थेत न ठेवता ते मोकळ्या करण्यात यावे, अशीही मागणी तक्रार अर्जात केली आहे.

ज्या समुदायाने बाप्पांची स्थापना लालबाग येथे केली त्याच कोळी समुदायाला डावलण्याचे काम मंडळाकडून होत असल्याचा आरोप समितीकडून करण्यात आला. त्यामुळे कोळी समुदायाला लालबागच्या राजाचा विसर्जनाचा मान शाबूत करण्यात यावा, तसेच एक दिवस आगरी-कोळी बांधवांसाठी राखीव ठेवण्याची मागणी मच्छिमार समितीने कडून करण्यात आली आहे.
 

Web Title: Akhil Maharashtra Fishermen Action Committee demands filing of criminal cases against the executive board of Lalbaghcha Raja Ganeshotsav Mandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.