Join us  

अजित पवारांनी राजीनामा दिला अन् केलं आभाराचं ट्विट!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 8:21 PM

शरद पवारांना आज पाठिंबा दर्शवण्यासाठी अनेक मोठे नेत मुंबईत दाखल झाले होते. परंतु अजित पवार यावेळी कुठेच दिसून आले नाहीत. त्यामुळे त्यांना या सर्वांपासून दूर ठेवण्यात आल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

मुंबई: राज्य सहकारी बँकेतील कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसोबतच पक्षाचे नेते व माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील ईडीने गुन्हा दाखल केला आहे. आज(शुक्रवारी) दिवसभराच्या सर्व ईडी नाट्यानंतर अजित पवारांनी अचानक आमदरकीचा राजीनामा दिल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच शरद पवारांना आज पाठिंबा दर्शवण्यासाठी अनेक मोठे नेत मुंबईत दाखल झाले होते. परंतु अजित पवार यावेळी कुठेच दिसून आले नाहीत. त्यामुळे त्यांना या सर्वांपासून दूर ठेवण्यात आल्याचे देखील सांगण्यात येत आहे. मात्र राजीनामा देण्यानंतर अजित पवारांनी एक आभार व्यक्त करणारं ट्विट केले आहे.

अजित पवार ट्विट करत म्हणाले की, आज मुंबईत आदरणीय साहेबांना मोठ्या संख्येनं मिळालेला चाहत्यांचा भक्कम पाठिंबा अभूतपूर्व आहे. त्यामुळे  पदाधिकारी वकार्यकर्त्यांचे मनापासून आभार! तसेच राजकीय हेवेदावे असले तरी,सत्याला साथ देण्यासाठी विरोधकही पुढे आले.हाच आदर,दृढ विश्वास कायम साहेबांसोबत राहील,याची खात्री असल्याचे त्यांनी ट्विटद्वारे सांगितले आहे. 

शरद पवार आज मुंबईमधील ईडीच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा करणार होते. यावेळी मुंबईत राष्ट्रवादीचे अनेक मोठे नेते शरद पवारांना पाठिंबा दर्शवण्यासाठी उपस्थित होते. मात्र अजित पवार या दरम्यान कुठेच दिसले नाही. त्यामुळे आज मुंबईपासून अजित पवारांना दूर ठेवले असल्याचे बोलले जात आहे. परंतु अजित पवारांनी राजीनामा नेमका का दिल्याचे कारण मात्र अजूनही गुलदस्यात आहे. तसेच शरद पवार पुण्यामध्ये आज रात्री 8.30च्या सुमारास माध्यमांशी संवाद साधणार आहेत. यावेळी शरद पवार अजित पवारांच्या राजीनाम्याबद्दल काय बोलणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

तसेच अजित पवारांनी आमदारकी सोडण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वीच घेतला होता, अशी माहिती आता समोर आली आहे. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना, अजित पवार यांच्या राजीनाम्याबद्दल काही महत्त्वपूर्ण खुलासा केला. 'दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी आपल्याला फोन केला होता. तुम्ही कुठे आहात एवढंच त्यांनी विचारलं होतं. मी त्यावेळी औरंगाबादला होतो. त्यानंतर, आज संध्याकाळी ५.४० वाजता त्यांनी विधानभवनातील माझ्या दालनात सागर नावाच्या 'पीएस'कडे स्वतःच्या हस्ताक्षरातील राजीनामा सोपवला. मी फोनवर त्यांना कारण विचारलं असता, आत्ता काही सांगत नाही, फक्त राजीनामा मंजूर करा, एवढंच ते म्हणाले' असं हरिभाऊ बागडे यांनी नमूद केलं. त्यांनी दिलेल्या या माहितीमुळे अनेक नवे प्रश्न, शंका निर्माण झाल्या आहेत.

शरद पवार आज मुंबईमधील ईडीच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांशी समक्ष चर्चा करणार होते. मात्र पवारांनी घराबाहेर पडू नये अन्यथा कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू शकते अशी विनंती पोलिसांनी शरद पवारांनी केली. त्यानंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधत पोलिसांच्या विनंतीला मान देत ईडी कार्यालयात जाणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र पुण्यात पावसाच्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या नुकसानाची पाहणा करण्यासाठी तात्काळ पुण्याला रवाना होत असल्याचे शरद पवारांनी ट्विट करत सांगितले.

टॅग्स :अजित पवारशरद पवारराष्ट्रवादी काँग्रेस