Join us  

काका अन् शिंदेसेनेपेक्षा निम्म्याही जागा मिळेनात; सातारा हातचे गेले; अजित पवार गटाची भिस्त नाशिकवर

By यदू जोशी | Published: April 17, 2024 9:20 AM

सातारची जागा अखेर भाजपकडे गेली.

यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाला शिंदेसेनेपेक्षा निम्म्याही जागा लढायला मिळणार नाहीत, हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. तसेच महाविकास आघाडीत शरद पवार गटाला मिळालेल्या जागांच्या तुलनेत निम्म्याच जागा अजित पवार गटाला मिळणार, असे दिसते. 

सातारची जागा अखेर भाजपकडे गेली. त्यामुळे अजित पवार गटाची भिस्त आता केवळ नाशिकच्या जागेवर आहे. अजित पवार गटाला बारामती, शिरूर, रायगड आणि उस्मानाबाद या चार जागा मिळाल्या. परभणीची जागा या गटाच्या कोट्यातून ‘रासप’चे महादेव जानकर यांना देण्यात आल्याचे सांगितले जाते. सातारची जागा भाजप घेणार असेल तर नाशिक आम्हाला द्या, असा आग्रह अजित पवार गटाने धरला होता. मात्र ती जागाही हातची गेली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात दोन; मराठवाड्यात केवळ एक- अजित पवार गटाला बारामती (सुनेत्रा पवार) आणि शिरूर (शिवाजीराव आढळराव पाटील) या पश्चिम महाराष्ट्रातील दोन जागा मिळाल्या आहेत. - मराठवाड्यात केवळ उस्मानाबादची जागा मिळाली. तेथे भाजपचे आमदार राणा जगजितसिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. 

सर्वात कमी जागा...शरद पवार गटाला महाविकास आघाडीत  एकूण दहा जागा मिळाल्या. महायुतीत शिंदेसेनेचे १० उमेदवार (श्रीकांत शिंदेंसह) आतापर्यंत जाहीर झाले आहेत. आणखी दोन ते तीन जागा त्यांना मिळतील, असे दिसते. नाशिकची जागा अजित पवार गटाला मिळाली तरी महाविकास आघाडी आणि महायुतीतील सहा प्रमुख पक्षांचा विचार करता सर्वात कमी जागा या गटाच्या वाट्याला येणार, असे दिसते.

नाशिकच्या जागेवर तिन्ही घटक पक्षांचा दावा महायुतीत अद्याप निर्णय झालेला नाही, अशा जागांमध्ये नाशिक ही एकच जागा अशी आहे की, ज्या जागेवर भाजप, शिंदेसेनेबरोबरच अजित पवार गटानेही दावा केला आहे. वादात असलेल्या पालघर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, ठाणे, औरंगाबादसह मुंबईतील दोन (मुंबई दक्षिण आणि उत्तर पश्चिम) या जागा भाजपकडे जाणार की शिंदेसेनेकडे हा वाद आहे. नाशिकच्या जागेचा अद्याप निर्णय झालेला नाही, उगाच उड्या मारू नका, असा टोला अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी अलीकडेच खा. हेमंत गोडसे यांना लगावला होता. 

विदर्भात अजित पवार गट शून्यअजित पवार  गटाला विदर्भातील दहापैकी एकही जागा मिळाली नाही. त्यांनी बुलढाणा, यवतमाळ-वाशिम, भंडारा-गोंदिया, गडचिरोली या चार जागा मागितल्या होत्या. गडचिरोलीतून मंत्री धर्मरावबाबा आत्राम आणि भंडारा-गोंदियातून पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची चर्चा होती; पण दोन्ही जागा भाजपने आपल्याकडे घेतल्या. बुलढाणा आणि यवतमाळ-वाशिम हे शिंदेसेनेकडे गेले. महाविकास आघाडीत शरद पवार गटाला वर्धेची जागा मिळाली, तेथे त्यांनी काँग्रेसकडून उमेदवार (अमर काळे) आयात केला.

टॅग्स :मुंबईअजित पवारराष्ट्रवादी काँग्रेस