Join us  

अजित पवार शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 9:53 PM

सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांचे स्वागत केले

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटण्यासाठी अजित पवार हे त्यांच्या सिल्व्हर ओक या निवास्थानी दाखल झाले आहेत. सिल्वर ओक येथे शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे सुद्धा उपस्थित आहेत.

नेपियन्सी रोडवरील श्रीनिवास पवार यांच्या घरातून निघालेले अजित पवार थेट शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी रात्री सव्वाआठच्या सुमारास  दाखल झाले. यावेळी शरद पवारांच्या घराचा दरवाजा उघडाच होता. तिथे सुप्रिया सुळे यांनी त्यांचे स्वागत केले. अजित पवार घरात जाताच दरवाजा बंद करून घेण्यात आला. त्यामुळे अजित पवार पुन्हा परल्याची चर्चा होत आहे.

राज्यातील सत्तासंघर्षात भाजपासोबत हातमिळवणी करणारे राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. अजित पवारांनी केलेल्या बंडामुळे शरद पवारांसह कुटुंबाला मोठा धक्का मानला जात होता. त्यामुळे अजित पवारांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रयत्नशील होते. मात्र अजित पवारांचे बंड थंड होत नसल्याने त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरुच होते.

यामध्ये शरद पवारांची पत्नी प्रतिभा पवार, सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करावे, त्यासाठी शरद पवार यांनी परवानगी द्यावी, असे आज झालेल्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.  

दरम्यान, विधानसभा निवडणुकीआधी तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा देऊन खळबळ उडवून देणाऱ्या अजित पवार यांनी गेल्या शनिवारी राज्यात मोठाच राजकीय भूकंप घडवला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी, आपले काका शरद पवार यांच्याशी बंड पुकारत त्यांनी भाजपाशी हातमिळवणी केली होती. त्यांच्या पाठिंब्याच्या जोरावरच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती, तर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले होते. 

अत्यंत घाईघाईत हा शपथविधी उरकण्यात आला होता. या शपथविधीविरोधात, भाजपाविरोधात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाविकासआघाडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने भाजपाला उद्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपाकडे बहुमत नसल्याची कबुली देत देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे राज्यातील अवघ्या साडेतीन दिवसाचे 'देवेंद्र सरकार-2' कोसळले आहे.  

टॅग्स :शरद पवारअजित पवारमुंबईराष्ट्रवादी काँग्रेस