लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पश्चिम रेल्वेनेमुंबईतील प्रमुख स्थानकांवर डिजिटल लाउंज म्हणजेच विश्रामगृह उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना विमानतळासारख्या सुविधा मिळतील असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सध्या रेल्वेस्थानकांवर असलेल्या वेटिंग रूममध्ये प्रवासी ट्रेनची वाट पाहू शकतात. तसेच, अधिक पैसे देऊन ते एक्झिक्युटिव्ह लाउंजमध्ये आराम करू शकतात. पण तिथे त्यांना ऑफिसची कामे करता येत नाहीत. त्यामुळे प्रवाशांच्या सोयी आणि सुविधा लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेचे नवे मुख्य व्यावसायिक व्यवस्थापक तरुण जैन यांनी पायलट प्रोजेक्ट सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, त्या अंतर्गत डिजिटल लाउंजची स्थापना केली जाणार आहे.
कसे असेल लाउंज?
जैन यांनी सांगितले की, हा प्रकल्प राबविण्यासाठी प्रथम स्थानके निश्चित केली जाणार आहेत. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन या पथदर्शी प्रकल्पांतर्गत काही स्थानकांवर डिजिटल लाउंज उभारले जाईल. हे लाउंज विमानतळाप्रमाणेच आधुनिक असेल. चार्जिंगसाठी प्लग पॉइंट, वायफाय, कॅफे, खुर्च्या, टेबल आणि सोफा यासारख्या सुविधा प्रवाशांना पुरविल्या जाणार आहेत.
अशा असतील विश्रामगृहातील सुविधा
- मोफत वीज
- काम करण्यासाठी खुर्ची आणि टेबल
- वायफाय
- प्लग पॉइंट
- कॅफे
केवळ प्रवासीच नाही, तर इतर नागरिकही याचा लाभ घेऊ शकतात
- उभारण्यात येणाऱ्या सुविधा केवळ प्रवाशांसाठीच नाही तर बाहेरील लोकांसाठीही उपलब्ध असेल. तसेच विद्यार्थीही येऊन आपली कामे करू शकतात.
- या ठिकाणी काही दुकानेही सुरू होणार आहेत. मुंबई शहरात अनेक कार्यरत व्यावसायिक आणि फ्रीलान्सर आहेत जे जवळच्या हॉटेल किंवा कॅफेमध्ये जाऊन काम करतात.
- येणाऱ्या काळात हे लोकही या डिजिटल लाउंजचा वापर करू शकतील, असा विश्वास जैन यांनी व्यक्त केला.