Join us

विमान कंपन्याच प्राणी-पक्ष्यांना परत पाठवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 11:39 IST

परदेशातून  तस्करी करून आणलेल्या प्राणी व पक्ष्यांच्या मुंबई, दिल्ली, चेन्नई व हैदराबाद विमानतळांवर जप्तीच्या घटना वाढत आहेत. 

मुंबई : देशभरातील विमानतळांवर तस्करीदरम्यान कस्टम विभागाकडून पकडल्या जाणाऱ्या प्राणी-पक्ष्यांना संबंधित विमान कंपनीद्वारेच परत पाठवण्याचे आदेश नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने दिले आहेत. ‘लोकमत’ने या संदर्भातील वृत्त प्रकाशित करत अशा प्रकरणांत प्राणी आणि पक्ष्यांची हेळसांड होत असल्याकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर महासंचालनालयाने या संदर्भातील आदेश दिले आहेत.

इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल प्रोटेक्शनच्या निशा कुंजू यांनी महानगर विमानचालन संचालनालय (डीजीसीए) यांना निवेदन दिले होते. परदेशातून  तस्करी करून आणलेल्या प्राणी व पक्ष्यांच्या मुंबई, दिल्ली, चेन्नई व हैदराबाद विमानतळांवर जप्तीच्या घटना वाढत आहेत. मुंबईसारख्या मोठ्या विमानतळांवर जप्त करण्यात आलेल्या पशु-पक्ष्यांसाठी तिथेच उपचार केंद्र स्थापन करत वैद्यकीय तज्ज्ञांची नेमणूक करावी. यासाठी विमानतळ प्राधिकरणाने पुढाकार घ्यावा. जेणेकरून हे पक्षी-प्राणी विमानतळाबाहेर येणार नाहीत, असे म्हटले होते.

प्राणी संगोपन, प्रमाणपत्र सेवा, सीमा शुल्क विभाग व डीजीसीएकडून परवानगी आवश्यक असून, त्याचा अहवाल डीजीसीएकडे देणेही बंधनकारक असणार आहे.  दरम्यान, प्राण्यांच्या आयातीबाबत नियमांची माहिती देणारे फलक लावणेही बंधनकारक करण्यात आले आहे.

टॅग्स :मुंबईविमानप्राणी