Join us
Daily Top 2Weekly Top 5

द्रुतगतीवरील अपघातग्रस्त वाहन करणार एअरलिफ्ट; मुख्यमंत्री फडणवीस : अपघातानंतरच्या कार्यवाहीसाठी एसओपी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 04:56 IST

भविष्यात अशा प्रकारच्या अपघातानंतर संबंधित टँकरला एअरलिफ्ट करता येऊ शकते का याची चाचणी एमएसआरडीसीच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर ज्वलनशील पदार्थांच्या वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात झाल्यास काय करायचे याची एसओपी ठरविण्यास संबंधित कंपन्यांना सांगण्यात आले आहे. तसेच मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम (आयटीएमएस) देखील सुरू करण्यात आली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या स्थितीत या यंत्रणेचा प्रभावी वापर करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी विधानसभेत सांगितले. 

भविष्यात अशा प्रकारच्या अपघातानंतर संबंधित टँकरला एअरलिफ्ट करता येऊ शकते का याची चाचणी एमएसआरडीसीच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर ३ फेब्रुवारी रोजी प्रोपेलिन या अतिज्वलनशील वायूचा टँकर उलटला होता. यामुळे ३६ तासांपेक्षा जास्त काळ वाहतूककोंडी निर्माण झाली होती. तसेच प्रवाशांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला होता. याबाबत चेतन तुपे, अमित साटम यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित करत उपाययोजना करण्याची मागणी केली. 

अत्याधुनिक यंत्रणा उभाराउद्धवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी हॅजमॅट व्हेईकल (धोकादायक पदार्थांची वाहतूक करणारे वाहन) युनिट तसेच बोगद्यात आग लागल्यास अग्निशमन युनिट उभारण्याची मागणी केली. राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) जयंत पाटील यांनी अशा परिस्थितीत पोलिस किंवा संबंधित यंत्रणेसाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करणे तसेच प्रवाशांना लाइव्ह माहिती पोहोचविण्याची मागणी केली.

प्रत्येक प्रवाशाला मिळणार लाईव्ह अपडेट...अतिज्वलनशील गॅस किंवा धोकादायक रसायने आदींची वाहतूक करणाऱ्या बहुतांश केंद्रीय कंपन्या आहेत. त्यांच्याकडे अशा स्थितीत मदत करण्याची यंत्रे नव्हती व एसओपी (प्रमाणित कार्यपद्धती) देखील नाही. आपल्याकडेही एसओपी नाही.त्यामुळे तशी एसओपी तयार करण्यास सांगण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तसेच अशा परिस्थितीत आपण हेलिकॉप्टर वापरतो, पण सूर्यास्तानंतर आपल्याकडे हेलिकॉप्टर वापरता येत नाहीत त्यामुळे त्यांच्या वापरावर मर्यादा आहेत.पण, आयटीएमएसचा प्रभावी वापर करण्यात येईल, त्यामुळे प्रत्येक प्रवाशाला व्यक्तिगतरीत्या लाइव्ह अपडेट मिळत राहील, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

लवकरच घेणार चाचणी, प्रवाशांना टोलही करणार परतया अपघातामुळे जरूर वाहतूककोंडी झाली पण वाहतूक पोलिस, एमएसआरडीसीचे अधिकारी यांनी ही परिस्थिती अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळली. एमएसआरडीसीकडून वाहतूककोंडीच्या काळातील ३६ तासातील वसूल केलेला टोल परत करण्याचा निर्णय घेतला गेला. इतर मोठ्या देशांमध्ये वायुगळती झाल्यानंतर असे टँकर त एअरलिफ्ट करून नेण्याची पद्धत आहे. हा पर्याय आपल्याकडेही वापरता येऊ शकतो का याची चाचणी एमएसआरडीसीच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Air-lifting accident vehicles on expressway; SOP for post-accident action.

Web Summary : Maharashtra government plans SOP for tanker accidents on Mumbai-Pune Expressway. Air-lifting accident vehicles will be tested. ITMS will provide live updates. Toll during the 36-hour traffic jam will be refunded. Focus is on advanced systems and passenger safety.
टॅग्स :देवेंद्र फडणवीसअपघात