Join us

२० टक्क्यांनी विमान प्रवास महागला; संप अन् गोंधळाचा फटका प्रवाशांना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 06:35 IST

मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशा स्थितीमुळे विमान तिकिटांच्या किमतीमध्ये २० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे दिसत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ऐन सुट्ट्यांच्या हंगामात एअर इंडिया एक्स्प्रेस कंपनीची विमानसेवा कोलमडल्यानंतर आता याचा फटका विमान तिकिटांच्या किमती वाढण्याच्या रूपाने प्रवाशांना बसण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या तीन दिवसांत कंपनीची १७५ पेक्षा जास्त विमान उड्डाणे रद्द झाली. त्यामुळे अन्य विमान कंपन्यांनी महत्त्वाच्या हवाई मार्गांवर अतिरिक्त फेऱ्या करण्यास सुरुवात केली. मात्र, मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशा स्थितीमुळे विमान तिकिटांच्या किमतीमध्ये २० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे दिसत आहे. 

सुट्ट्यांच्या हंगामात मुंबईतून काश्मीर, लेह, हिमाचल प्रदेश, गोवा, मध्य प्रदेश, उत्तराखंड, दक्षिणेतील काही राज्यांत पर्यटक मोठ्या प्रमाणावर जात आहेत. अनेकांनी जरी प्रवासाचे नियोजन करत आगाऊ बुकिंग केले आहे. मात्र, मे महिन्याच्या उर्वरित काळासाठी जे बुकिंग करत आहे, त्यांना शहरनिहाय प्रति तिकीट दोन ते आठ हजार रुपये खर्च करावा लागत आहे. त्यातच सध्या देशात विमानांचीही मोठ्या प्रमाणावर कमतरता आहे. 

५६ विमाने जमिनीवर गो-फर्स्टची सर्व ५६ विमाने जमिनीवर आहेत, तर एअर इंडिया, इंडिगो, स्पाइस जेट या कंपन्यांचीही काही विमाने तांत्रिक कारणांमुळे जमिनीवरच आहेत. प्राप्त माहितीनुसार, देशात सध्या ७५० विमाने असली, तरी केवळ ५५० विमानेच कार्यरत आहेत, तर देशातील विमान प्रवाशांची संख्या दिवसाकाठी वाढत आहे. त्यामुळे तिकिटांच्या किमती वाढण्यास सुरुवात झाली आहे.

    मुंबई ते श्रीनगर    ३३,०९६    मुंबई ते लेह    २५,५३६    मुंबई ते चंडीगड    २३,१२३    मुंबई ते कोची    १२,५७२    मुंबई ते बंगळुरू    ८,१४७    मुंबई ते गोवा    ७,८५१ 

टॅग्स :विमानतळएअर इंडिया