मरिन ड्राइव्हचीही हवा बिघडली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 01:00 AM2019-11-23T01:00:17+5:302019-11-23T01:05:35+5:30

‘सफर’ची माहिती; वातावरणात धुळीचे कण

The air on the Marine Drive was also damaged | मरिन ड्राइव्हचीही हवा बिघडली

मरिन ड्राइव्हचीही हवा बिघडली

Next

मुंबई : ‘क्वीन नेकलेस’ म्हणजे राणीचा हार म्हणून ओळख असलेला मरिन ड्राइव्हदेखील प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे. त्याआधी वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) आणि माझगाव येथील हवा प्रदूषित नोंदविण्यात येत असतानाच आता यात मरिन ड्राइव्हची भर पडली आहे. परिणामी, मुंबईच्या वातावरणातील धूळ, धूर यांचे मिश्रण असलेले धूरके दिवसागणिक वाढतच असून, त्यामुळे मुंबईदेखील दिल्लीसारखीच प्रदूषित होईल की काय? अशी भीती पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली आहे.

दिल्ली येथील प्रदूषण काही केल्या कमी होत नसल्याचे चित्र आहे. ‘सफर’ या संकेतस्थळावर शुक्रवारी दिल्लीच्या हवेतील सूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण ३३९ एवढे नोंदविण्यात आले आहे. मुंबई ते १९५ असून, पुणे येथे ११८ आहे. दिल्लीसह राज्यातील शहरांमधील प्रदूषणाचे प्रमाण वाढत असतानाच दिल्लीतील वायुप्रदूषण रोखण्यासाठी केंद्र सरकारने तयार केलेल्या समितीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातील वायुप्रदूषण रोखण्यासाठी विशेष समिती स्थापन करून समग्र योजना तयार करावी, असे म्हणणे लोकप्रतिनिधींकडून मांडण्यात येत आहे.
दरम्यान, नोव्हेंबर २०१७ मध्ये दिल्लीतील वायुप्रदूषण नियंत्रित करण्यासाठी पंतप्रधानांच्या प्रधान सचिवांच्या नेतृत्वाखाली ‘हाय लेव्हल टास्क फोर्स’ची स्थापना करण्यात आली. पर्यावरण विभागामार्फत ‘नॅशनल क्लीअर एअर प्रोग्रॅम’ची सुरुवात करण्यात आली आहे. याच धर्तीवर मुंबईतील आणि विशेष करून दक्षिण-मध्य मुंबईतील वायुप्रदूषणाची समस्या सोडविण्यासाठी केंद्र सरकारने विशेष योजना तयार करावी, अशी मागणी जोर धरत आहे.


वायुप्रदूषणाची कारणे
कारखाने, वाहने यातून बाहेर पडणारे विषारी वायू, रस्ते, इमारतींचे बांधकाम-निष्कासन यांतून उडणारी धूळ, कचऱ्याच्या ज्वलनामुळे होणारा धूर ही मुंबईतील वायुप्रदूषणाची मुख्य कारणे आहेत.
प्रमाण काय पाहिजे?
केंद्रीय वायुप्रदूषण नियंत्रण समिती वायूच्या गुणवत्तेसाठी ठरवून दिलेल्या मानकांपेक्षा जास्त प्रदूषण दक्षिण-मध्य मुंबईतील सायन परिसरात आहे. मुंबईच्या हवेतील धुळीचे प्रमाण १४७ आहे. हे प्रमाण ६० पाहिजे.

हवेतील सूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण स्तरनिहाय
चांगली : ० ते ३०
समाधानकारक : ३० ते ६०
मध्यम : ६० ते ९०
वाईट : ९० ते १२०
अत्यंत वाईट :
१२० ते २५०
तीव्र : २५० ते ३८०

हवेची गुणवत्ता
(हवेतील सूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण)
कुलाबा २१८
वरळी २०४
दादर ११०
वांद्रे ११२
चेंबूर २२०
सायन २४६
कुर्ला २२३
घाटकोपर २८३
विलेपार्ले २०८
पवई १६७
कांदिवली २१०
बोरीवली १३७

मुंबईत खालील सर्वच ठिकाणांवरील हवा आरोग्यास हानिकारक असल्याची नोंद स्कायमेटने केली आहे.

Web Title: The air on the Marine Drive was also damaged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.