एअर इंडियाला ३० लाखांचा दंड- व्हीलचेअर अभावी वृद्धाच्या मृत्यूप्रकरणी डीजीसीएची कारवाई
By मनोज गडनीस | Updated: February 29, 2024 17:22 IST2024-02-29T17:22:33+5:302024-02-29T17:22:53+5:30
संबंधित वृद्ध व्यक्ती ही न्यूयॉर्क येथून मुंबईत एअर इंडिया कंपनीच्या विमानाने आली होती.

एअर इंडियाला ३० लाखांचा दंड- व्हीलचेअर अभावी वृद्धाच्या मृत्यूप्रकरणी डीजीसीएची कारवाई
मुंबई - न्यूयॉर्कवरून मुंबईत दाखल झालेल्या एका ८० वर्षीय वृद्धाला व्हीलचेअर न मिळाल्यामुळे चालावे लागले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणाची नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) गंभीर दखल घेत या प्रकरणी एअर इंडिया कंपनीला ३० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही घटना १२ फेब्रुवारी रोजी मुंबई विमानतळावर घडली होती.
संबंधित वृद्ध व्यक्ती ही न्यूयॉर्क येथून मुंबईत एअर इंडिया कंपनीच्या विमानाने आली होती. या वृद्ध व्यक्तीच्या मृत्यूच्या घटनेची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर डीजीसीएने या प्रकरणाची गंभीर दखल घेत एअर इंडीयाला कारणे दाखवा नोटिस जारी करत सात दिवसांच्या आत उत्तर देण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने एअर इंडियाने डीजीसीएच्या नोटिशीला उत्तर दिले होते.
मात्र, कंपनीने दिलेले उत्तर समाधानकारक नसल्याचे सांगत डीजीसीएने ही दंडाची कारवाई केली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने देखील स्वतःहून घेतली असून या प्रकरणी आयोगाने नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला (डीजीसीए) नोटिस जारी केली आहे. तसेच, आगामी चार आठवड्यामध्ये या प्रकरणी खुलासा करण्याचे निर्देश यापूर्वी दिले आहेत.