मुंबई : माझ्यासोबत ८२ वर्षाची आजी प्रवास करणार असून, तिला विमानतळावर व्हीलचेअर उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली असतानाही कंपनीने त्याकडे दुर्लक्ष केले. व्हीलचेअर न मिळाल्याने आजी चालत निघाली. त्यामुळे ती पडली. ती आता अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे, अशी तक्रार एका महिलेने नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे (डीजीसीए) केली आहे.
पारूल कन्वर असे या तक्रारदार महिलेचे नाव असून, तिने ही तक्रार एअर इंडियाविरोधात केली आहे. ४ मार्च रोजी पारूल आपल्या आजीसोबत दिल्लीहून बंगळुरूला निघाल्या होत्या. आजीच्या प्रकृतीची पूर्वकल्पना एअर इंडियाला दिली होती. त्यानुसार त्यांनी विमानतळावर व्हीलचेअर उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त होते. परंतु, एक तास थांबूनही काहीच मदत मिळाली नाही, असे कन्वर यांनी तक्रारीत नमूद केले आहे. मात्र, एअर इंडिया कंपनीने कन्वर यांचा दावा तथ्यहीन असल्याचे म्हटले आहे. दोन्ही महिला विमानतळावर उशिरा दाखल झाल्या. त्यावेळी विमानतळावर गर्दी असल्याने अखेरच्या १५ मिनिटांत व्हीलचेअर उपलब्ध करून देणे शक्य झाले नाही. त्यामुळे आजीबाईनी स्वतः चालत जाण्याचा निर्णय घेतला. त्या पडल्याचे समजल्यानंतर त्यांना आम्ही तातडीने वैद्यकीय मदतदेखील उपलब्ध करून दिल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.