हवेतील गारवा ओसरला; मुंबईकरांना उन्हाचे चटके
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2019 05:31 IST2019-03-10T05:29:45+5:302019-03-10T05:31:50+5:30
मुंबईचे कमाल तापमान ३२ तर किमान तापमान २० अंशावर स्थिर असून, वाढते ऊन मुंबईकरांना ‘ताप’दायक ठरत आहे.

हवेतील गारवा ओसरला; मुंबईकरांना उन्हाचे चटके
मुंबई : मुंबईचे कमाल तापमान ३२ तर किमान तापमान २० अंशावर स्थिर असून, वाढते ऊन मुंबईकरांना ‘ताप’दायक ठरत आहे. विशेषत: रात्रीच्या हवेतील गारवाही कमी झाला असून, वाढत्या उन्हामुळे आता मुंबईकर त्रस्त झाले आहेत. राज्यातील वातावरणही कोरडे नोंदविण्यात येत असून, विदर्भ आणि मराठवाड्याला हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडील शनिवारच्या सकाळच्या साडेआठच्या नोंदीनुसार, राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान मालेगाव येथे ३७.८ तर सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे १३.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. ११ मार्च रोजी मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. १२ ते १३ मार्चदरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. रविवारसह सोमवारी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२, २० अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.
मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल आणि किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.