वायू आणि जलप्रदूषणाने माहुलवासीय ‘आजारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 12:59 AM2019-11-23T00:59:07+5:302019-11-23T00:59:11+5:30

मुंबई : सरकारने एक तर आम्हाला दुसरे घर द्यावे किंवा घराचे भाडे द्यावे, अशा आशयाचा सूर माहुलकरांचा कायम आहे. ...

Air and water pollution cause 'sick' residents | वायू आणि जलप्रदूषणाने माहुलवासीय ‘आजारी’

वायू आणि जलप्रदूषणाने माहुलवासीय ‘आजारी’

Next

मुंबई : सरकारने एक तर आम्हाला दुसरे घर द्यावे किंवा घराचे भाडे द्यावे, अशा आशयाचा सूर माहुलकरांचा कायम आहे. कारण येथील वायू आणि जलप्रदूषणाचे प्रमाण दिवसागणिक वाढत असून, वाढत्या प्रदूषणाचा फटका माहुलकरांच्या आरोग्याला बसत आहे. वासाने गरगरणे, दम लागणे, खोकला येणे, अंगावर खाज येणे, डोळे दुखणे, पोटांचे विकार, असे अनेक आजार येथील रहिवाशांना होत आहेत.
माहुल येथील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या मागणीकडे सरकारने लक्ष दिलेले नाही. येथे पाच हजार कुटुंबे राहत असून, प्रदूषणाने त्यांचा जीव धोक्यात आला आहे. महापालिकेने एमएमआरडीए, म्हाडा, एसआरएसारख्या प्राधिकरणांकडून घरे मिळण्याबाबतचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र काहीच प्राप्त झालेले नाही. माहुलमधील रासायनिक कारखान्यांमुळे येथील हवा प्रदूषित आहे. प्रदूषणामुळे येथे अनेकांचा मृत्यू झाला असून, सर्वच रहिवासी प्रदूषणाचा सामना करत आहेत. माहुल परिसर मानवी वस्तीस योग्य नाही, असा अहवालही यापूर्वी आला आहे.

शहर आणि उपनगरातील विविध प्रकल्पग्रस्त विशेषत: तानसा जलवाहिनी प्रकल्पात घर गमावलेल्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन प्रशासनाने माहुल येथे केले आहे.
दीड ते दोन वर्षांपासून प्रकल्पग्रस्त रहिवासी येथील प्रदूषणाने त्रस्त झाले असून, येथून दुसरीकडे स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
अपुऱ्या सुविधा, प्रदूषण अशा विविध समस्यांनी ग्रासलेले पुनर्वसित माहुलवासीय स्थलांतराच्या मागणीवर ठाम आहेत.
हताश नागरिकांनी पूर्वी ते ज्या भागात राहायचे, त्या भागातील आमदारांना प्रश्न विचारले.
मात्र, काहीच कार्यवाही झाली नाही.
मुंबई शहर आणि उपनगरात विविध प्रकल्पबाधितांसाठी विविध ठिकाणी बांधण्यात आलेल्या १ लाख १२ हजार घरांपैकी पडून असलेली ११ हजार घरे माहुल येथील ५ हजार ५०० प्रकल्पबाधितांना दिली, तर आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या माहुलकरांच्या स्थलांतरणाचा प्रश्न सुटणार आहे.

Web Title: Air and water pollution cause 'sick' residents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.