उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 07:35 IST2025-12-28T07:34:26+5:302025-12-28T07:35:09+5:30
जलील म्हणाले, पक्षाने या निवडणुका अत्यंत गांभीर्याने घेतल्या आहेत. मुंबई, ठाणे, वसई विरार या महापालिकेसाठी इच्छुक उमेदवारांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे...

उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
खलील गिरकर -
मुंबई : एमआयएमतर्फे पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या उमेदवारांसाठी आता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना लिखित स्वरूपात हमी द्यावी लागणार आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी खासदार इम्तियाज जलील यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुंबईत स्वतः मुलाखती घेतल्या. त्यावेळी ‘लोकमत’शी बोलताना जलील यांनी ही माहिती दिली.
जलील म्हणाले, पक्षाने या निवडणुका अत्यंत गांभीर्याने घेतल्या आहेत. मुंबई, ठाणे, वसई विरार या महापालिकेसाठी इच्छुक उमेदवारांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. जे पदाधिकारी उमेदवारांची शिफारस करतील, त्यांना उमेदवाराचे वर्तन व कामगिरीबाबत लिखित स्वरूपात पक्षाला हमीपत्र द्यावे लागणार आहे. रविवारी दुसरी उमेदवारी यादी जाहीर केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक शहर अध्यक्षांना सोबत बसवून जलील यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. मुंबईतील इच्छुकांच्या मुलाखतीवेळी फारूख शाब्दी, तर मुंब्रा येथील मुलाखतींवेळी सैफ पठाण उपस्थित होते. भिवंडी महापालिकेसाठी पक्षाचे प्रतिनिधी मंडळ पाठवून तेथील निर्णय घेतला जाणार आहे.
एमआयएमचे प्रमुख पदाधिकारी निवडणूक रिंगणात उतरतील. मुंबईतील प्रचारासाठी पक्षाध्यक्ष खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी येणार असल्याची माहिती जलील यांनी दिली.
एमआयएमकडून सात जणांना संधी -
एमआयएमने मुंबई महापालिकेसाठी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत सात जणांना उमेदवारी दिली आहे. प्रभाग क्रमांक १३४ ते १४० साठी अनुक्रमे मेहजबीन खान, इर्शाद खान, मो. जमीर कुरेशी, शामीर पटेल, रोशन शेख, शबाना शेख व विजय उबाळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.