नालेसफाईवर एआयचा वॉच! कंत्राटदाराच्या फोटो आणि व्हिडीओचे विश्लेषण करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 08:43 IST2025-04-22T08:43:02+5:302025-04-22T08:43:22+5:30
पारदर्शक कामाचा पालिकेचा दावा, रिअल टाइम जिओ-टॅगसह व्हिडीओ आणि फोटो तयार करून ती सॉफ्टवेअरवर अपलोड करणे कंत्राटदारांना बंधनकारक आहे.

नालेसफाईवर एआयचा वॉच! कंत्राटदाराच्या फोटो आणि व्हिडीओचे विश्लेषण करणार
मुंबई : मुंबईतील नालेसफाईच्या कामात दरवर्षी कंत्राटदारांकडून हातसफाई होत असल्याचा आरोप झाल्याने यंदा पालिकेने यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार कंत्राटदारांनी लहान-मोठ्या नाल्यांमधून केलेल्या गाळ उपशाचे व्हिडीओ एआय प्रणालीचा वापर करून तपासण्यात येणार आहेत. त्यामुळे गाळ उपशाच्या कामाची योग्य देखरेख करणे, त्यात संपूर्ण पारदर्शकता आणण्यास मदत होणार आहे.
पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून पालिकेतर्फे छोट्या व मोठ्या नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. या कामासाठी शहर आणि उपनगरांत २३ कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. यंदा पालिकेने कंत्राटांमध्ये अधिक कडक अटी व शर्तींचा समावेश केला असून, त्यानुसार गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. यामध्ये कंत्राटदाराला फोटोसह ३० सेकंदाचा व्हिडीओ बंधनकारक करण्यात आला आहे. तर लहान नाल्यांमधून गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण बंधनकारक असून, या सगळ्याचे विश्लेषण एआयमार्फत होणार आहे. तसेच पालिकेने नागरिकांसाठी ही सर्व माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. जेणेकरून नागरिकांना आपापल्या परिसरातील नाल्याच्या स्वच्छतेचे तपशील घरबसल्या पाहता येतील. यासाठी रिअल टाइम जिओ-टॅगसह व्हिडीओ आणि फोटो तयार करून ती सॉफ्टवेअरवर अपलोड करणे कंत्राटदारांना बंधनकारक आहे.
देखरेखीसाठी होणार मोबाइल ॲपचाही वापर
अभियंत्यासाठी ॲपवर विशिष्ट लॉग इन निश्चित करण्यात आले असून, हे मोबाइल ॲप नाल्याच्या सीमेपासून २० मीटरच्या आत कार्य करेल. अस्पष्ट किंवा पिक्सेलयुक्त प्रतिमा टाळण्यासाठी मोबाइल ॲपमध्ये इमेज घोस्टिंग शोधण्याची प्रणाली आहे. प्रत्येक वाहनासाठी स्वयंचलित लॉग-शीट आणि संपूर्ण प्रवासाचा मागोवा ठेवण्यासाठी वेगळा क्रमांक देण्यात येणार आहे. वजन काट्यावर स्वयंचलित वजन मापन प्रणाली कार्यरत राहील. युनिक ट्रिप क्रमांकाच्या आधारे वाहनाचे वजन आपोआप नोंदवले जाईल. वजन मापन करताना ३० सेकंदांचा व्हिडीओ नोंदवला जातो, मोबाईल ॲपद्वारे हा व्हिडीओ घेण्याची सुविधा असेल. वाहन ट्रॅकिंग प्रणालीशी हे सॉफ्टवेअर संबंधित असेल.
गाळ उपशाबाबत कंत्राटदारांना सूचना
गाळ उपसून नाल्याबाहेर ४८ तास वाळवला जातो. त्यानंतर वाहनांत भरून त्याचे वजन केले जाते. तेथून तो विल्हेवाट स्थळी नेला जातो. रिकाम्या वाहनाचे पुन्हा वजन केले जाते. कंत्राटदारांना अशा पद्धतीने काम करण्याच्या सूचना आहेत.