कृषीसह सर्व क्षेत्रात एआय तंत्रज्ञान स्वीकारावे; फेलोशिप प्रदान कार्यक्रमात शरद पवार यांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 12:23 IST2025-12-15T12:23:05+5:302025-12-15T12:23:26+5:30
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे आयोजित 'शरद पवार इन्स्पायर फेलोशिप कार्यक्रमात' ते बोलत होते.

कृषीसह सर्व क्षेत्रात एआय तंत्रज्ञान स्वीकारावे; फेलोशिप प्रदान कार्यक्रमात शरद पवार यांचा सल्ला
मुंबई : बदलत्या काळानुसार प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञान झपाट्याने पुढे जात आहे. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा सकारात्मक स्वीकार करणे ही काळाची गरज आहे, असा सल्ला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे आयोजित 'शरद पवार इन्स्पायर फेलोशिप कार्यक्रमात' ते बोलत होते.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जीवन प्रवासाची पार्श्वभूमी लक्षात घेऊनच हा फेलोशिप कार्यक्रम आखण्यात आला आहे. अनेकदा कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही केवळ कर्तृत्वाच्या जोरावर पुढे जाणारे लोक असतात. यशवंतराव चव्हाण हे त्याचे सर्वोत्तम उदाहरण होते, असे त्यांनी सांगितले. साध्या पार्श्वभूमीतून आलेल्या त्यांनी मुख्यमंत्री, संरक्षणमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्र मंत्री अशी अनेक महत्त्वाची पदे भूषविली. यावरून कर्तृत्वाचा मक्ता हा काही ठरावीक लोकांकडे नसतो, हे स्पष्ट होते. योग्य संधी आणि प्रोत्साहन मिळाले तर सामान्य कुटुंबातील व्यक्तीही मोठे कार्य करू शकते, असे ते म्हणाले.
सर्वच क्षेत्रांत आमूलाग्र बदल
शेती, शिक्षण, आरोग्य, नागरी विकास अशा सर्वच क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आमूलाग्र बदल घडत आहेत. शेतीत एआयच्या वापरामुळे उत्पादन वाढते, पाणी व खतांचा वापर २५ ते ३० टक्क्यांनी कमी करता येतो आणि उत्पन्नात मोठी वाढ शक्य होते. ही जमेची बाजू लक्षात घेऊन या तंत्रज्ञानाचा स्वीकार केला पाहिजे, असे पवार म्हणाले.
यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे २२ फेलोशिप प्रदान
यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे एकूण २२ फेलोशिप देण्यात आल्या, त्यापैकी प्रातिनिधिक स्वरूपात पवार यांच्या हस्ते तिघांना या कार्यक्रमात प्रदान करण्यात आल्या. यात शिक्षण क्षेत्रातील आनंद आनेमवाड, साहित्य रेश्मा तांबोळी आणि कृषी क्षेत्रातील अंकित टेटर यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे दत्ता बाळ सराफ यांनी प्रास्ताविक केले, तर फेलोशिपची पार्श्वभूमी चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्षा खा. सुप्रिया सुळे यांनी सांगितली. नव्या वर्षांपासून केवळ महिलांसाठी १० फेलोशिप देण्याची घोषणा सुळे यांनी यावेळी केली.