वाहतूककोंडीचा त्रास संपवण्यासाठी AI तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत टोल नाक्याचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 16:17 IST2025-11-11T16:16:28+5:302025-11-11T16:17:29+5:30
AI Based Toll Naka in Mumbai: कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नवीन टोल भरणा प्रक्रिया चालू करण्यासंबंधीच्या सूचना विभागाला देण्यात आल्याची माहिती

वाहतूककोंडीचा त्रास संपवण्यासाठी AI तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत टोल नाक्याचा प्रस्ताव
AI Based Toll Naka in Mumbai: मुंबईच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारावर होणाऱ्या वाहतूककोंडीचा आणि वायू प्रदूषणाचा त्रास संपविण्यासाठी दहिसर टोलनाक्याऐवजी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून टोल भरणा प्रक्रिया वेगवान करण्याचा नवा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला वरिष्ठ अधिकारी हजर होते.
मंत्री सरनाईक म्हणाले, "दहिसर टोलनाक्यावर दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत असून त्यामुळे ॲम्बुलन्स, स्कूलबस आणि अत्यावश्यक सेवांना अडथळा निर्माण होतो. यामुळे प्रदूषणात भर पडते आणि प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाया जातो. हा टोल नाका स्थलांतरित करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. परंतु स्थानिक नागरिकांनी टोल नाक्याच्या स्थलांतरणाला विरोध केला आहे. त्यांची बाजू देखील रास्त असून त्यांच्या भुमिकेचा विचार करून टोल नाक्यावरील गर्दी टाळण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नवीन टोल भरणा प्रक्रिया चालू करण्यासंबंधीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आलेल्या आहेत."
AI-आधारित टोल प्रणालीचा नवा युगप्रवेश!
“टोलवसुली अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करावी. वाहनांच्या नंबर प्लेट स्कॅन करणाऱ्या AI कॅमेऱ्यांद्वारे स्वयंचलित टोल भरणा होईल, ज्यामुळे टोल नाक्यांवरील लांबच लांब रांगा भूतकाळात जातील. तसेच, दोन टोलनाक्यांचा भरणा एकाच ठिकाणी करण्याची संकल्पना अमलात आणल्यास वाहतूक आणखी सुरळीत होईल", असेही त्यांनी सांगितले.
रस्ते विकास व कायमस्वरूपी समाधानाची दिशा
बैठकीत पेणकर फाटा, सिग्नल येथील वाहतूक सुलभता आणि दिल्ली दरबार हॉटेल ते दहिसर टोल नाका या मार्गावरील रस्ता रुंदीकरणाची कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले.