मुंबई - अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या अपघातग्रस्त विमानाचे कॅप्टन सुमीत सभरवाल यांची निवृत्त होऊन बेडरिडन असलेल्या वडिलांची सेवा करण्याची इच्छा होती. मात्र, त्यांची ही शेवटची इच्छा अपूर्णच राहिली.
पवईच्या जलवायू विहारमध्ये राहणारे सुमीत सभरवाल यांचे ८८ वर्षीय वडील या अपघाताची माहिती कळल्यानंतर हादरून गेले आहेत. विमानोड्डाणाला तासभर असताना सुमीत यांनी वडिलांना फोन केला होता. लंडनला पोहोचल्यावर फोन करतो, तोवर काळजी घ्या, असेही सांगितले होते. त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर भेटायला येणाऱ्या सुहृदयांना वडिलांनी ही आठवण सांगितली. सभरवाल यांच्या आईचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर वडिलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी सुमीत यांच्यावर आली. सभरवाल अविवाहित होते, अशी माहिती नातेवाइकांनी दिली.