Join us

लग्नाच्या हॉलमधून अहेराची बॅग लंपास, चोर सीसीटीव्हीत कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 07:02 IST

जोगेश्वरीत राहणारे मोहीत शेवाळे यांची मेव्हणी अमृता वरणकर हिचे लग्न सुयश कोदारे याच्यासोबत होणार होते.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: बोरीवलीत एका लग्नाच्या हॉलमध्ये अहेराची पिशवी चोराने लंपास करत पळ काढला. हा सगळा प्रकार शनिवारी उघडकीस आला असून, चोरांचे चेहरे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. त्यानुसार, कुटुंबीयांनी याची तक्रार एमएचबी कॉलनी पोलिसांकडे नोंदविली असून, त्यांचा शोध सुरू आहे.

जोगेश्वरीत राहणारे मोहीत शेवाळे यांची मेव्हणी अमृता वरणकर हिचे लग्न सुयश कोदारे याच्यासोबत होणार होते. त्यानुसार, वधुकडील मंडळी म्हात्रे गार्डन या ठिकाणी असलेल्या हॉलमध्ये मुक्कामासाठी जमा झाली होती. दुसऱ्या दिवशी ते सर्व विवाह कार्यासाठी दुर्गा गार्डन परिसरात गेले. तिथे विवाह समारंभ पार पडला आणि सर्व जण जेवायला गेले, तेव्हा मोहित यांची सासू रूपाली यांनी अहेर, तसेच अन्य मौल्यवान वस्तू असलेली मुकेश ज्वेलर्स नामक पांढरी पिशवी वधुकक्षात ठेवत त्याला कुलूप लावले. कुटुंबीय जेवून परत आले, तेव्हा मात्र ती पिशवी गायब होती. त्यामुळे नातेवाइकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, ती कुठेच सापडली नाही. मात्र, खोलीची खिडकी उघडी होती, त्यामुळे त्यांना संशय आला. अखेर याबाबत त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. 

 पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली असता दोन संशयित त्या परिसरात फिरताना त्यांना दिसले. त्यापैकी एक जण खिडकीतून वधुकक्षात प्रवेश करत तिथून पळ काढताना दिसत आहे. त्या पिशवीत जवळपास दीड ते दोन लाखांचा ऐवज होता, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. या प्रकरणी आम्ही गुन्हा दाखल करत तपास करत आहोत, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांनी दिली.

टॅग्स :मुंबईलग्न