Join us  

Agusta Westland Scam : भ्रष्टाचार म्हणून ज्या सापास झोडपतो, ती एक निर्जीव रस्सी निघते-उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 7:39 AM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

मुंबई - व्हीव्हीआयपी ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळाप्रकरणी इटलीतील मिलान कोर्टानं ऑगस्टा वेस्टलँड व फिनमेकॅनिका कंपनीचे माजी प्रमुख गिसेपी ओरसी, ग्यूसेपे ओरसी व ब्रुनो स्पेगनोलिनी तसंच बिचोलिए क्रिस्तीयन मिशेल यांसह सर्व आरोपींना पुराव्याअभावी दोषमुक्त ठरवल्यानं भारताला मोठा धक्का बसला आहे. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून भाष्य केले आहे. ''इटलीतील न्यायालयाने ‘ऑगस्ता’ प्रकरणात भ्रष्टाचार झाला नसल्याचा निर्वाळा दिला तसा ‘टु जी’ घोटाळा हा कपोलकल्पित असल्याचा निर्णय दिल्लीतील विशेष न्यायालयाने दिला. त्यामुळे विरोधकांच्या आरोपांकडे किती गंभीरपणे पाहायचे असा प्रश्न यापुढे देशवासीयांना पडला असेल. भ्रष्टाचार म्हणजे काय? हे आता नव्याने ठरवावे लागेल. विरोधी पक्षांत असताना ‘भ्रष्टाचार भ्रष्टाचार’ म्हणून ज्या सापास झोडपतो तो साप नसतो. सत्तेवर येताच ती एक निर्जीव ‘रस्सी’ निघते'', असे उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमध्ये म्हटले आहे. 

काय आहे आजचे सामना संपादकीय?भ्रष्टाचार म्हणजे नक्की काय? हे आता पुन्हा एकदा नव्याने तपासावे लागेल. एखाद्या प्रकरणात ‘भ्रष्टाचार झाला हो ss’ म्हणून बोंबलायचे. रस्त्यांपासून संसदेपर्यंत गोंधळ घालायचा. संसदेच्या आणि विधिमंडळाच्या टेबलावर असलेल्या व नसलेल्या पुराव्यांच्या फायली आपटायच्या, चौकशी समित्या नेमून काहीजणांच्या गाडी-घोड्यांची सोय करायची, राजकीय विरोधकांचे ‘काटे’ काढण्यासाठी चमचे मंडळींना सुपाऱ्या द्यायच्या, पण शेवटी या सगळ्याचे फलित काय? तर ज्यांच्यावर बेधुंद आरोप झाले तेच लोक न्यायालयात पुराव्याअभावी निर्दोष सुटतात. हे गेल्या पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा घडले आहे. टु जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातून माजी दूरसंचारमंत्री ए. राजा व खासदार कनिमोळी यांच्यासह अनेकांना होलसेलात निर्दोष ठरविण्याचा निर्णय सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिला व आता पाठोपाठ ऑगस्ता वेस्टलॅण्ड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारात कोणतीही लाचखोरी झाली नसल्याचा निर्णय इटलीतील एका न्यायालयाने दिला आहे. हिंदुस्थानने अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी इटलीतील संबंधित कंपनीकडून लाच स्वीकारली व त्यामुळे तत्कालीन राज्यकर्ते, हवाई दलप्रमुख व त्यांच्या नातेवाईकांच्या खिशात सुमारे ३६० कोटींचे कमिशन गेल्याची बोंब ठोकून हिंदुस्थानी लष्कराच्या व्यवहारावर व सचोटीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

भ्रष्टाचार झालाच आहे व आता फक्त संशयित आरोपींना फासावर लटकवायचेच बाकी आहे असे वातावरण याप्रकरणी आरोप करणाऱ्यांनी बनवले होते. या प्रकरणात तत्कालीन नौदलप्रमुख एस. पी. त्यागी यांनाही आरोपी केले व अटक करून तुरुंगात टाकले. या खटल्याचे पुढे जे व्हायचे ते होईल, पण इटलीतील कोर्टातही हा खटला उभा राहिला व या प्रकरणात लाचखोरी झाली नसल्याचा निर्णय देऊन इटलीतील त्या हेलिकॉप्टर कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांना मुक्त केले. या निर्णयाचा परिणाम हिंदुस्थानातील खटल्यावर नक्कीच होणार आहे. माजी हवाई दलप्रमुख त्यागी हे निर्दोष असतील तर त्यांची सुटका व्हायलाच हवी. पण त्यांना जो मनस्ताप व तुरुंगवास भोगावा लागला त्याची भरपाई कशी होणार? राजकारण्यांनी बेताल आरोप करायचे व त्या दबावाखाली येऊन राष्ट्रीय तपास यंत्रणांनी अटका वगैरे करायच्या हे किती दिवस चालणार? पुन्हा नंतर हे सर्व खोटे ठरते तेव्हा राजकारण्यांचे काहीच जात नाही, पण सीबीआयसारख्या संस्थांच्या प्रतिष्ठेचे मात्र धिंडवडे निघतात. ‘टु जी’ प्रकरणात ते निघालेच आहेत व ऑगस्ता वेस्टलॅण्ड प्रकरणातील तपास त्याच दिशेने जाताना दिसत आहे. राजकारणी आरोपांचा धुरळा उडवून एखाद्याची बदनामी करतात. पण त्यामुळे ज्यांच्यावर चिखलफेक होते त्यांना पुढे काय भोगावे लागते याचा विचार कुणीच करीत नाही. 

‘टु जी’ घोटाळय़ाचा आरोप भाजपनेच केला होता व ऑगस्ता वेस्टलॅण्ड प्रकरणांतही काळेबेरे असल्याचा संशय आधी भाजपनेच व्यक्त केला. भाजपची सत्ता दिल्लीत असतानाच त्या दोन्ही प्रकरणांची हवा न्यायालयाने काढली. जसे इटलीतील न्यायालयाने ‘ऑगस्ता’ प्रकरणात भ्रष्टाचार झालाच नसल्याचा निर्वाळा दिला तसा ‘टु जी’ घोटाळा हा बनावट व कपोलकल्पित असल्याचा निर्णय दिल्लीतील विशेष न्यायालयाने दिला. बोफोर्स प्रकरणातही वेगळे घडले नव्हते. त्यामुळे विरोधकांच्या आरोपांकडे किती गंभीरपणे पाहायचे असा प्रश्न यापुढे देशवासीयांना पडला असेल. मुंबईतील माजी पालिका उपायुक्त खैरनार यांच्याकडे शरद पवारांविरुद्ध ट्रकभर पुरावे होते. अण्णा हजारेंकडेही होते. अजित पवार, तटकरे यांच्या विरोधात बैलगाडीभर पुरावे आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ते विरोधी पक्षात असताना होते व सिंचन घोटाळ्यात राष्ट्रवादीचे नेते तुरुंगात जाण्याच्या तारखा ते देत होते. पण पवार-तटकरे राहिले बाजूला. भाजपच्या एकनाथ खडसे यांनाच जमीन घोटाळ्यात ‘लटकावे’ लागले. भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्यासाठी ‘लोकपाल’ हवाच असे भाजपला सत्तेत येण्याआधी ठामपणे वाटत होते. तो लोकपालही आता बेपत्ता झाला आहे. भ्रष्टाचार म्हणजे काय? हे आता नव्याने ठरवावे लागेल. विरोधी पक्षांत असताना ‘भ्रष्टाचार भ्रष्टाचार’ म्हणून ज्या सापास झोडपतो तो साप नसतो. सत्तेवर येताच ती एक निर्जीव ‘रस्सी’ निघते. सध्या तेच चाललेले दिसते.

टॅग्स :ऑगस्टा वेस्टलँड घोटाळाउद्धव ठाकरेभाजपाशिवसेना