मराठा क्रांती महामोर्चा मुंबईचा आक्रमक पवित्रा; उद्यापासून आझाद मैदान आमरण उपोषण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 22:32 IST2023-09-04T22:30:47+5:302023-09-04T22:32:56+5:30
जालना मराठा मोर्चा आंदोलकांवर झालेल्या पोलीस लाठीचार घटनेच्या निषेधाचे पडसाद आता मुंबईतही उमटले आहेत.

मराठा क्रांती महामोर्चा मुंबईचा आक्रमक पवित्रा; उद्यापासून आझाद मैदान आमरण उपोषण
श्रीकांत जाधव
मुंबई : जालना मराठा मोर्चा आंदोलकांवर झालेल्या पोलीस लाठीचार घटनेच्या निषेधाचे पडसाद आता मुंबईतही उमटले आहेत. सकल मराठा समाज मराठा क्रांती महामोर्चा मुंबईने आक्रमक पवित्रा घेत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करीत मंगळवार, ५ सप्टेंबरपासून आझाद मैदान येथे आमरण उपोषण पुकारले आहे. तसेच भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांची हकालपट्टी करा, अशी मागणी लावून धरली आहे.
यासंदर्भात मराठा क्रांती महामोर्चाचे कार्यकर्ते अमोल ( भैय्या ) जाधवराव यांनी सोमवारी पत्रकार संघात तातडीने परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.
जालना येथील मराठा क्रांती मोर्चाचे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण शांतता मार्गाने चालू होते. मात्र हे आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांना मंत्रालयातून फोन करण्यात आला. त्यानंतर पूर्ण तयारीसह पोलिसांचा फौजफाटा घेऊन मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज तसेच गोळीबार करायला भाग पाडले. या मागे दुसरे कोणी नसून गृहमंत्र्यांच्या आदेशानेच हे सर्व सुरू असल्याचा आरोप मराठा क्रांती महामोर्चाचे अमोल जाधवराव यांनी यावेळी केला.
यावेळी त्याच्यासोबत संजय घार्गे, बाबा गुंजाळ, धनंजय शिंदे, युवराज सूर्यवंशी आदी १२ कार्यकर्ते उपोषण करणार आहेत.
लाठीचार्ज घटनेचा आम्ही समाज म्हणून निषेध करीत आहोत. तसेच मराठा आरक्षण मागणीसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांवर अशा प्रकारे अन्याय होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. यापूर्वी ही आमची उग्र आंदोलने जनतेने पहिली आहेत. पोलिसांच्या केसेस घेण्यास मराठा आंदोलनकर्ता कधीही मागे हटणार नाही. मराठा समाजानेच दगडफेक केल्याचे विधान करून समाजाच्या सामाज्याचा जखमांवर मीठ चोळण्याचा पराक्रम गृहमंत्र्यांनी केला आहे. त्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवत नाही तोवर आमचे आमरण प;उपोषण सुरु राहील असेही जाधवराव यांनी स्पष्ट केले.