एजंटच बनतो इन्स्पेक्टर; मुंबईतील चारही आरटीओ कार्यालयांमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स परीक्षा नावापुरती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 10:22 IST2025-08-09T10:22:31+5:302025-08-09T10:22:55+5:30
लायसन्स देण्याआधी ऑनलाइन लर्निंग टेस्ट, प्रत्यक्ष वाहन चालविण्याची ड्रायव्हिंग टेस्ट घेणे बंधनकारक आहे.

एजंटच बनतो इन्स्पेक्टर; मुंबईतील चारही आरटीओ कार्यालयांमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स परीक्षा नावापुरती
महेश कोले
मुंबई : प्रादेशिक परिवहन विभागामार्फत (आरटीओ) वाहन चालविण्यासाठी आवश्यक असलेले लायसन्स दिले जात असले तरी, प्रत्यक्ष परीक्षा एजंटकडूनच घेतली जात असल्याचे समोर आले. ‘लोकमत’ने मुंबईतील चारही आरटीओ कार्यालयांमध्ये भेट दिल्यानंतर मोटार वाहन निरीक्षक सहीपुरते असल्याचे दिसले. प्रत्यक्ष चाचणी एजंट किंवा ट्रेनिंग स्कूलचे प्रशिक्षक घेतात.
लायसन्स देण्याआधी ऑनलाइन लर्निंग टेस्ट, प्रत्यक्ष वाहन चालविण्याची ड्रायव्हिंग टेस्ट घेणे बंधनकारक आहे. अंतिम चाचणी मोटार वाहन निरीक्षकाकडून किंवा एआयएमव्हीकडून घेण्याचा नियम असतानाही, ते धाब्यावर बसवण्यात येत आहेत. त्यामुळे उमेदवार योग्य चाचणी न देता पक्के लायसन्स मिळविले जात आहे.
चित्रीकरणासाठी मज्जाव
ड्रायव्हिंग टेस्ट पारदर्शक व्हावी यासाठी न्यायालयाने सर्व आरटीओमध्ये सीसीटीव्ही लावण्याचे निर्देश आहेत. असे असताना मुंबई सेंट्रल आरटीओमध्ये फोटो/ व्हिडीओ काढण्यास सक्त मनाई असे पोस्टर लावले आहेत.
बोरीवली आरटीओमध्ये उमेदवारांची चाचणी खासगी इंस्ट्रक्टरकडून घेण्यात येत असून मोटार वाहन इन्स्पेक्टर मात्र कागदपत्रांची पडताळणी आणि सही करत आहेत. येथे २ ते ४ मीटर गाडी पुढे आणि मागे घेतल्यावर परीक्षा पास करण्यात येत होते.
प्रत्यक्षात काय दिसले?
‘लोकमत’च्या प्रतिनिधीने चारही आरटीओ कार्यालयांमध्ये जाऊन लायसन्स टेस्ट कशी घेतली जाते, ते पाहिले. चारही आरटीओमध्ये एजंट किंवा ट्रेनिंग स्कूलचेच प्रतिनिधी ड्रायव्हिंग टेस्ट घेताना दिसले. इन्स्पेक्टर केवळ पेपर तपासून सही करण्याचे काम करत होता.
बोरिवली आरटीओमध्ये तर गाडी केवळ २–३ मीटर पुढे आणि पुन्हा मागे घेतली जात होती. त्यानंतर संबंधित चालक परीक्षा उत्तीर्ण होत होता. काही उमेदवार तर गाडीही सुरू करू शकत नव्हते. तरीही त्यांना उत्तीर्ण करण्यात आले.
मुंबई सेंट्रलमध्ये एजंटच परीक्षा घेत होता, असे आढळले असून तो केवळ स्टिअरिंगवर हात ठेवण्याचे सांगत होता. अनेक उमेदवार तर गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर पहिल्यांदा बसत असल्याचे त्यांनी सांगितले.
वाहन चालवण्याच्या परीक्षेत अधिकाऱ्यांकडून काही हलगर्जीपणा होत असेल तर ते चुकीचे आहे. याबाबत नक्कीच कारवाई केली जाईल.
विवेक भिमनवार, आयुक्त, परिवहन विभाग
मुंबईतच वर्षभरात ३.२१ लाख लायसन्स
मुंबईतील ताडदेव, वडाळा, अंधेरी आणि बोरिवली आरटीओ कार्यालयांमध्ये २०२४ मध्ये एकूण ३ लाख २१ हजार ड्रायव्हिंग लायसन्स देण्यात आले. परंतु, त्यातील सर्व उमेदवारांनी खरोखरच नियमानुसार प्रत्यक्ष चाचणी दिली का? की एजंटच्या आशीर्वादाने ते परीक्षा उत्तीर्ण झाले?, असा सवाल करण्यात येत आहे.
ट्रॅक नाही म्हणून रस्त्यावर टेस्ट
बोरिवली आरटीओच्या अधिकाऱ्यांना याबाबत
विचारले असता, त्यांच्या कार्यालयाकडे स्वतंत्र टेस्ट ट्रॅक नसल्यामुळे टेस्ट रस्त्यावर घेतली जाते, असे सांगण्यात आले. याशिवाय अंधेरी व बोरिवलीसाठी लवकरच संयुक्त टेस्ट ट्रॅक तयार केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आरटीओच्या दुर्लक्षाचा परिणाम... लायसन्स रद्द
मुंबई महानगर प्रदेशात गेल्या पाच वर्षांत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३९,६२७ चालकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. अपुरे प्रशिक्षण व बेजबाबदार लायसन्स वितरण हे यामागील प्रमुख कारण ठरत आहे.
ड्रायव्हिंग लायसन्स प्रक्रियेत पारदर्शकता आणि कडक अंमलबजावणीचा अभाव अपघातांचे मूळ कारण असून आरटीओने स्वतःच नियम मोडले तर मग रस्त्यावर शिस्त कशी राहील, असा प्रश्न उपस्थित होत आहे.