...तर त्या अधिकाऱ्यांना घरी बसवून एजंटलाच काम देऊ: परिवहन मंत्री सरनाईक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 06:23 IST2025-08-12T06:23:07+5:302025-08-12T06:23:07+5:30
संबंधितांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात येणार

...तर त्या अधिकाऱ्यांना घरी बसवून एजंटलाच काम देऊ: परिवहन मंत्री सरनाईक
मुंबई : वाहन चालवण्यासाठीचा परवाना देताना उमेदवाराची योग्यता तपासण्यासाठी अधिकाऱ्यांनी योग्यरित्या चाचणी घेणे बंधनकारक आहे. जर त्याजागी एजंट उमेदवारांकडून पैसे घेऊन चाचणी घेत असेल आणि अधिकारी डोळसपणे कामात हलगर्जीपणाने वागत असतील तर त्यांना घरी बसवू आणि एजंटलाच कामावर ठेऊ, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले. 'लोकमत'ने शनिवारी 'एजंटच बनतो इन्स्पेक्टर' वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करत त्यांना कारणे दाखवा नोटीस देणार असल्याचे सांगितले.
प्रादेशिक परिवहन विभागामार्फत वाहन चालवण्यासाठी आवश्यक असलेले परवाना दिला जातो. यासाठी प्रत्यक्ष परीक्षा घेतली जाते. 'लोकमत'च्या प्रतिनिधीने मुंबईतील चारही आरटीओ कार्यालयांमध्ये भेट देऊन तिथलाआढावा घेतला होता. दरम्यान, मोटार वाहन निरीक्षक केवळ सहीपुरते असल्याचे उघड झाले होते. प्रत्यक्ष चाचणी एजंट किंवा ट्रेनिंग स्कूलचे प्रशिक्षक घेत असल्याचे वास्तव होते. याबाबत परिवहन मंत्री सरनाईक यांना विचारले असता ते म्हणाले की, संबंधितांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांना योग्यता तपासण्यासाठी शासनाचा पगार देत आहोत. जर त्याऐवजी एजंट चाचणी घेत असतील तर ते चुकीचे आहे. कारण चाचणी दरम्यान जरी उमेदवाराने चुकी केली तरी याकडे ते साहजिकच दुर्लक्ष करणार. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले.