Join us
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' आजींनी दोन दिवस मृत पतीसोबत मारल्या गप्पा अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 06:28 IST

भोईवाडा परिसरातील बीडीडी चाळीतील घटना

मुंबई : वृद्धापकाळात पतीच्या आधारावर जगत असताना, त्याने साथ सोडली. घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजारच्यांनी पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांनी बसलेल्या आजीशेजारील कुजलेल्या अवस्थेतील आजोबांना बाहेर काढले. तेव्हा आजींनी ‘अहो ते जिवंत आहेत. माझ्याशी गप्पा मारत होते. त्यांना नका नेऊ,’ असे म्हणत टाहो फोडल्याची मन हेलावणारी घटना भोईवाडा परिसरात शुक्रवारी घडली.बीडीडी चाळीत विजय जगन्नाथ वाघमारे (६६) हे पत्नी विजया (६५) सोबत राहायचे. मूलबाळ नाही. दोघेच एकमेकांना आधार देत जगत होते. दोघांचेही एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास त्यांच्या बंद घरातून दुर्गंधी येत होती. त्यात, दोन दिवस झाले, तरी घरातून कोणी बाहेरही फिरकले नाही. शेजारच्यांनी दरवाजा ठोठावला. मात्र, आतून प्रतिसाद न मिळाल्याने, त्यांनी पोलिसांना याबाबत कळविले. घटनेची वर्दी लागताच भोईवाडा पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तेव्हा आजोबांच्या कुजलेल्या मृतदेहाच्या शेजारी आजारी शांत बसलेल्या दिसून आल्या. पोलिसांनी आजोबांचा मृत्यू झाला आहे, हे आजींना सांगताच त्यांनी पोलिसांनाच, ते जिवंत असल्याचे सांगितले. आम्ही आता गप्पा मारत होतो, असेही त्या म्हणाल्या.अखेर पोलिसांनी कशीबशी त्यांची समजूत काढत, मृतदेह ताब्यात घेत, शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. या घटनेमुळे परिसरातही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकारामुळे आजींनाही मानसिक धक्का बसला आहे. त्या अजूनही आजोबा जिवंतच असल्याचा भ्रमात आहे. या प्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे समारे आले आहे, असे भोईवाडा पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :मृत्यू