Join us  

चेंबूरवासी वाहनतळाच्या प्रतीक्षेत; वाहनतळ बांधून दीड वर्ष उलटूनही बंद अवस्थेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 3:02 AM

जलतरण तलाव व वाहनतळाचे नूतनीकरण होण्याआधी सर्वसामान्यांसाठी येथे पार्किंग उपलब्ध होते.

मुंबई : चेंबूर पूर्व येथील महापालिकेच्या एम-पश्चिम वॉर्डशेजारील महानगरपालिकेचे वाहनतळ बांधून दीड वर्ष उलटले. तरीदेखील सर्वसामान्यांसाठी हे वाहनतळ अद्याप खुले करण्यात आलेले नाही. २०१८ साली एम-पश्चिम वॉर्डशेजारी असलेल्या जागेत जलतरण तलाव व त्याला लागूनच हे वाहनतळ बांधण्यात आले. जलतरण तलावाचे उद्घाटन करून ते सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले. परंतु वाहनतळ मात्र अद्यापही पार्किंगसाठी बंद ठेवण्यात आले. पालिका हे वाहनतळ नेमके कधी सुरू करणार आहे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

येथील जलतरण तलाव व वाहनतळाचे नूतनीकरण होण्याआधी सर्वसामान्यांसाठी येथे पार्किंग उपलब्ध होते. चेंबूर स्थानक परिसरात येणारे नागरिक वाहने येथे पार्क करीत होते. स्थानकाजवळील मार्ग क्रमांक १ तसेच आंबेडकर उद्यान येथील अनधिकृत पार्किंगचे प्रमाण कमी होते. २०१५ साली या जागेचे नूतनीकरण सुरू झाले व पार्किंग बंद करण्यात आले. परिणामी, अनधिकृत पार्किंगचे प्रमाण वाढले.

चेंबूर स्थानकाचा पूर्वेकडील परिसर नेहमीच गजबजलेला असतो. अनधिकृत पार्किंगचे प्रमाण वाढले असल्याने पादचारी आणि वाहनचालकांना याचा त्रास होत आहे. एम-पश्चिम वॉर्डशेजारील जनरल अरुणकुमार वैद्य जलतरण तलाव येथे असणारे वाहनतळ सुरू केल्यास परिसरातील अनधिकृत पार्किंगचे प्रमाण कमी होईल, असे सर्वसामान्यांचे म्हणणे आहे. हे वाहनतळ सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात यावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

टॅग्स :पार्किंगचेंबूरमहाराष्ट्रमुंबई