Join us  

Video: चक्क देव्हाऱ्यातच ठेवला सोनू सूदचा फोटो, व्हिडिओ पाहून अभिनेता म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2020 4:14 PM

चित्रपटात खलनायक असलेला सोनू सूद लॉकडाऊन कालावधीत केलेल्या कार्यामुळे रियल लाईफमध्ये नायक बनला आहे. आपल्या मदतीच्या कृतीने कोट्यवधी भारतीयांची मने सोनूने जिंकली आहेत

मुंबई - बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने गेल्या काही दिवसांपासून मुंबईत अडकून पडलेल्या मजुरांच्या सेवेत स्वत:ला वाहून घेतले आहे. या मजुरांना सुरक्षित घरी पोहोचवण्याचे काम सोनू करतोय. सोनूकडे मदतीचे हजारो मॅसेज येत आहेत. अशात काही भन्नाट मॅसेज चर्चेचा विषयही ठरले आहेत. एकाने सोनूकडे गर्लफ्रेन्डला भेटव, म्हणून मदत मागितली. तर एका बहाद्दराने चक्क दारूच्या दुकानापर्यंत पोहोचव, म्हणून सोनूला मॅसेज केला. तर, सोनूच्या कामाचं कौतुक करताना नेटीझन्स भन्नाट कलाकृतीही सादर करत आहेत. आता, चक्क एकाने सोनू सूदचा फोटो देव्हाऱ्यात ठेऊन आरती केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

चित्रपटात खलनायक असलेला सोनू सूद लॉकडाऊन कालावधीत केलेल्या कार्यामुळे रियल लाईफमध्ये नायक बनला आहे. आपल्या मदतीच्या कृतीने कोट्यवधी भारतीयांची मने सोनूने जिंकली आहेत. सोनू सूदच्या या कामाची दखल सर्वच स्तरातून घेण्यात येत आहे. अगदी, गावात पोहोचलेल्या मजुरांपासून ते केंद्रीयमंत्र्यांपर्यंत सर्वचजण सोनूच्या कामाचं कौतुक करत आहेत. कुणी चित्र काढून, कुणी व्हिडिओ बनवून, कुणी कविता लिहून, कुणी गाणं म्हणून सोनुचे आभार मानत आहेत. मात्र, एका चाहत्याने, सोनूच्या माध्यमातून आपल्या गावी पोहोचलेल्या तरुणाने चक्क देवघरातील देव्हाऱ्यात सोनूला स्थान दिलं आहे. या तरुणाने देव्हाऱ्यातील साईबाबांच्या मुर्तीजवळ सोनूचा फोटो ठेवत, त्याची आरती केली आहे. या युवकाने आरतीचा हा व्हिडिओ ट्विटरवरुन शेअर केला आहे.  

चक्क देव्हाऱ्यात आपला फोटो अन् आरतीचा व्हिडिओ पाहून सोनूही अवाक झाला आहे. सोनूने हात जोडून, भावा असं काही करु नकोस. माझ्यासाठीही देवाकडे प्रार्थना करा, असं आईला सांग. सर्वकाही ठिक होईल, असे सोनूने म्हटलंय. 

दरम्यान, लॉकडाऊनमध्ये सोनू सूद लोकांसाठी दिवसरात्र खपतो आहे. त्याच्या या कामाचे सर्वस्तरातून कौतुक केवळ बॉलिवूड सेलेब्स आणि सामान्य लोकांनीच नाही तर अनेक राजकीय व्यक्तींनी सुद्धा केले आहे.  नुकतेच राज्यपालांनी सुद्धा सोनूला भेटीला बोलवत त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. सोनू सूदने 1999 मध्ये साऊथ सिनेमातून त्याच्या अभिनयाला सुरुवात केली होती. 2001 मध्ये त्याने शहिद ए आजम मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आतापर्यांत सोनूने अनेक सिनेमात खलनायकाची भूमिका साकारली आहे. मात्र ख-्या आयुष्यात मात्र सध्या तो सर्वांचा हिरो ठरला आहे.

 

टॅग्स :सोनू सूदमंदिरस्थलांतरणकोरोना वायरस बातम्यामुंबई