Join us
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनंतर आणखी एक मंत्री राज ठाकरेंच्या भेटीला; पुन्हा चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 18:38 IST

गुढीपाडवा मेळाव्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थ निवासस्थानी गेल्यानंतर या चर्चेने जोर धरला होता

मुंबई – राज्यात महाविकास आघाडीविरुद्ध भाजपा असं चित्र काही दिवसांपूर्वी राज्याच्या वर्तुळात पाहायला मिळत होतं. पण आता यात राज ठाकरेंच्यामनसे पक्षाचीही चर्चा सुरू झाली आहे. गुढी पाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी थेट राष्ट्रवादी-शिवसेनेला लक्ष्य केले होते. या मेळाव्याच्या भाषणात राज ठाकरेंनी कुठेही भाजपाविरोधात भाष्य केले नाही. आगामी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने ही घडामोड महत्त्वपूर्ण आहे.

महापालिका निवडणुकीत भाजपा-मनसे(MNS-BJP) एकत्र येणार का? अशी चर्चा कायम होत आहे. गुढीपाडवा मेळाव्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थ निवासस्थानी गेल्यानंतर या चर्चेने जोर धरला होता. गडकरी यांनी राज ठाकरेंशी कौटुंबिक संबंध असल्याचं सांगत घर पाहण्यासाठी भेट घेतली असं सांगितले. परंतु राजकीय वर्तुळात या भेटीचं विशेष महत्त्व होते. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी शिवसेना-राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता. त्यानंतर झालेली ही भेट होती. मात्र आता पुन्हा आणखी एका केंद्रीय मंत्र्यांनी भाजपा नेत्यांसोबत राज ठाकरेंचं ‘शिवतीर्थ’ गाठलं आहे.

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे(Raosaheb Danve) यांच्यासह भाजपाचे माध्यम प्रमुख विश्वास पाठक, प्रवक्त्या शायना एनसी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली आहे. संध्याकाळी ४ ते ४.३० या वेळेत ही भेट झाली. या भेटीत विविध विषयांवर राज ठाकरे आणि रावसाहेब दानवे यांच्यात चर्चा झाली. यात रेल्वेच्या जागेवर होणाऱ्या अतिक्रमणावरही चर्चा झाली. मात्र रावसाहेब दानवे यांच्या भेटीने भाजपा-मनसे एकत्र येणार का? या चर्चेलाही उधाण आलं आहे.

देवेंद्र फडणवीसांनीही दिलेत संकेत

गुढी पाडवा मेळाव्यानंतर भाजपा-मनसे युती होईल का? असा प्रश्न राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्रकारांनी विचारला होता. त्यावेळी फडणवीस म्हणाले की, राजकारणात खूप गोष्टी घडत असतात. प्रत्येक गोष्टीचा अन्वयार्थ त्या त्या वेळी निघत असतो. आता या संदर्भात आपण वाट बघितली पाहिजे. आमचे राज ठाकरेंसोबत अनेक वर्षाचे संबंध आहेत. त्यांची भेट घेणे म्हणजे आश्चर्याशी गोष्ट नाही. यापुढेही आम्ही भेट घेऊ त्याचा आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही असं त्यांनी म्हटलं होतं.  

टॅग्स :मनसेराज ठाकरेरावसाहेब दानवे