Join us

पराभवानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह वाढला; ठाकूर यांचे नसीम खान यांच्यावर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 05:46 IST

मुंबई काँग्रेसमध्येही पक्षाचे नेते नसीम खान आणि सूरजसिंग ठाकूर यांच्यातील वाद समोर आला आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह वाढू लागला आहे. नागपूर मध्यचे काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी काँग्रेसच्या पराभवाला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना जबाबदार धरले असतानाच, मुंबई काँग्रेसमध्येही पक्षाचे नेते नसीम खान आणि सूरजसिंग ठाकूर यांच्यातील वाद समोर आला आहे.

बंटी शेळके यांना शनिवारी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावल्यानंतर काँग्रेसने सूरजसिंग ठाकूर यांनाही नसीम खान यांच्याविरोधात निवडणुकीत काम केल्याचे कारण देत नोटीस बजावली आहे. या नोटिसीवर सात दिवसांत लेखी खुलासा करण्याची सूचना काँग्रेसने ठाकूर यांना पाठविलेल्या पत्रात केली होती, पण त्यांनी याचा तातडीने खुलासा करत नसीम खान यांच्यावर आणखी गंभीर आरोप केले आहेत.  

नसीम खान पक्षाला कंपनी समजतात!

सूरजसिंग म्हणाले, नसीम खान यांनी पक्षाच्या मुंबई अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत काम केले होते. त्याचबरोबर प्रिया दत्त यांना विधानसभेची उमेदवारी देण्याबाबत चर्चा सुरू झाल्यावर त्यांनाही विरोध केला होता. याबाबत पक्षाकडे तक्रार करूनही त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली नाही. नसीम खान हे पक्ष प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असल्यासारखे वागत असून सातत्याने कार्यकर्त्यांना डावलत असतात, असा आरोपही ठाकूर यांनी केला आहे.

टॅग्स :काँग्रेस