प्रवेश प्रक्रियेच्या स्थगितीनंतर आता ‘सार’ची नोंदणीही रद्द; अभाविपची सीईटी कार्यालयांवर धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 04:41 AM2019-06-22T04:41:35+5:302019-06-22T04:42:24+5:30
सर्व्हर डाउनचा फटका प्रवेश प्रक्रियेला बसला आणि प्रक्रिया स्थगित करण्यात आली. मात्र त्यानंतर, सार पोर्टलवरील नोंदणी का रद्द करण्यात आली, असा सवाल तज्ज्ञांकडून आणि पालकांकडून विचारण्यात येत आहे.
मुंबई : प्रथम वर्ष इंजिनीअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर आणि हॉटेल व्यवस्थापन अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अचानक स्थगित करण्यात आल्यानंतर, व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सार पोर्टलद्वारे होणारी नोंदणीही रद्द करण्यात आल्याची माहिती सीईटी सेलद्वारे जारी करण्यात आली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे निर्देश, सीईटी सेलचे आयुक्त म्हणून सध्या अतिरिक्त भार पाहत असलेल्या माणिक गुरसाळ यांच्याकडून देण्यात आले आहेत.
सर्व्हर डाउनचा फटका प्रवेश प्रक्रियेला बसला आणि प्रक्रिया स्थगित करण्यात आली. मात्र त्यानंतर, सार पोर्टलवरील नोंदणी का रद्द करण्यात आली, असा सवाल तज्ज्ञांकडून आणि पालकांकडून विचारण्यात येत आहे. नवीन वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर मागील वर्षाप्रमाणेच यंदाही आता संचालनालयांकडून प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल, अशा हालचाली दिसत आहेत.
अडीच लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची व्यावसायिक अभ्यासक्रमांची नोंदणी रद्द झाल्यामुळे पालक आणि विद्यार्थी संतप्त झाले असून, सीईटी सेलच्या बाहेर प्रचंड गर्दी होत आहे. एकाएकी प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याने, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा निषेध करत, अभाविपने फोर्ट येथील सीईटी कार्यालयावर गुरुवारी धडक दिली. सीईटी सेलने नेमलेल्या एजन्सीजमुळे प्रवेश प्रक्रियेला फटका बसला. त्यामुळे त्यांना त्वरित काढून टाकावे आणि पूर्वीप्रमाणे एफसी सेंटर कार्यान्वित करून प्रवेश प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी करत त्यांनी धरणे धरले.
दरम्यान, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया अचानक स्थगित केल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी सीईटी सेलची नवीन जाहीर सूचनाही सीईटी आयुक्त आनंद रायते यांच्याऐवजी प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या माणिक गुरसाळ यांच्या नावे जारी करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या बदलीच्या चर्चांना उधाण आले आहे. सीईटी सेलच्या माहितीनुसार त्यांच्याकडे काही काळ अतिरिक्त भार देण्यात आला आहे.
समन्वयाचा अभाव
व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थी-पालकांना झालेला मनस्ताप संताप आणणारा आहे. शासनाच्या विभागांमध्येच समन्वय नसताना, प्रक्रिया योग्य पद्धतीने चालविली जाईल, अशी अपेक्षाच नाही. मात्र, आता नवीन प्रक्रियेत तरी सरकारने स्वत: लक्ष देऊन ती पार पाडावी आणि विद्यार्र्थ्यांना मनस्तापापासून वाचवावे, अशी अपेक्षा आहे.
- वैभव नरवडे, प्राध्यापक