Join us  

'शिवबंधन'नंतर शिवसैनिकांसाठी आता 'वाघाची अंगठी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2018 4:48 PM

शिवबंधनापाठोपाठ आता शिवसैनिकांना वाघाच्या अंगठीचं वाटप करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई -  शिवबंधनापाठोपाठ आता शिवसैनिकांना वाघाच्या अंगठीचं वाटप करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मंगळवारी (23 जानेवारी) जयंती आहे, त्यापार्श्वभूमीवर या अंगठ्यांचं वाटप करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

शिवसेनेच्या कुलाबा विभागाच्यावतीने ससून बंदर येथे वाघाच्या मुखाची प्रतिकृती असलेल्या खास अंगठ्यांचं वाटप करण्यात आले आहे. यावेळी खासदार अरविंद सावंत, विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी खासदार सावंत यांच्या हस्ते विभागातील सुमारे 800 शिवसैनिकांना या अंगठ्यांचं वाटप करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

2012 मध्ये शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले होते. यानंतर पक्षाची पडझड होऊ नये आणि पक्षावर मजबूत पकड राहावी म्हणून 2014 मध्ये सायनच्या सोमय्या मैदानावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांच्या मनगटावर शिवबंधन बांधले होते.यानंतर आज पुन्हा तीन वर्षानंतर शिवबंधनपाठोपाठ शिवसैनिकांना वाघाचं चित्र असलेल्या अंगठ्यांचं वाटप करण्यात आलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंगठ्यांचं वाटप करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे आगामी काळात शिवबंधनपाठोपाठ शिवसैनिकांच्या हातात वाघाची अंगठी दिसू लागणार आहे.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे येत्या 26 जानेवारीला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या एकदिवसीय दौ-यावर जाणार आहेत. 26 जानेवारीला होणा-या या एकदिवसीय सिंधुदुर्ग दौ-यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वेंगुर्ला येथील उपजिल्हा रूग्णालयाचा भूमिपुजन सभारंभ आयोजित करण्यात आला आहे.  दुपारच्या सुमारास आंगणेवाडी येथील भराडी मातेचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर त्यांच्या हस्ते राज्यस्तरीय कृषि प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. 

टॅग्स :शिवसेनाउद्धव ठाकरेबाळासाहेब ठाकरे