पालघरनंतर मुंबईतही कॉपीचा प्रकार, बारावीच्या परीक्षेतील दोषींवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 05:30 IST2025-02-19T05:30:06+5:302025-02-19T05:30:33+5:30
मंगळवारी घाटकोपरमधील एका शाळेत कॉपी करताना विद्यार्थ्याला पकडून कारवाई करण्यात आली आहे.

पालघरनंतर मुंबईतही कॉपीचा प्रकार, बारावीच्या परीक्षेतील दोषींवर कारवाई
मुंबई : पालघर जिल्ह्यातील ओम साई शाळेत बारावीच्या परीक्षेत डमी विद्यार्थ्याला कॉपी करताना पकडल्याने पालघर पोलिसांनी संबंधित विद्यार्थ्यांवर गुन्हा नोंदवून चौकशी सुरू केली आहे. तर मंगळवारी घाटकोपरमधील एका शाळेत कॉपी करताना विद्यार्थ्याला पकडून कारवाई करण्यात आली आहे.
यंदा कॉपीमुक्त परीक्षा असावी, यासाठी मुंबई विभागात भरारी पथके तैनात केली आहेत. सोमवारी पालघर जिल्ह्यातील वसईमधील ओम साई शाळेत परीक्षेवेळी भरारी पथकाने तपासणी करताना अरबाज कुरेशी या विद्यार्थ्याचा डमी उमेदवार म्हणून परीक्षेसाठी बसलेल्या अहमद खानला अटक केली. तर मंगळवारी घाटकोपरमधील एस. व्ही. के. सार्वजनिक हायस्कूलमधील वाणिज्य शाखेतील सेक्रेटरिएल प्रॅक्टिस या विषयाच्या परीक्षेदरम्यान परीक्षा नियंत्रक यांनी एका विद्यार्थ्याला कॉपी करत असतांना पकडले. त्याची चौकशी सुरू केली आहे.
कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी प्रविष्ट केले गेले असतील तर त्याची माहिती मंडळाला देणे बंधनकारक आहे. तसेच जी कनिष्ठ महाविद्यालये मंडळाने निर्धारित केलेल्या तारखांना माहिती जमा करणार नाही, त्यांना आयटी ऑनलाइन परीक्षेसाठीचे लॉगिन दिले जाणार नाही, असे विभागीय मंडळाच्या सचिव ज्योत्स्ना शिंदे पवार यांनी पत्रकात नमूद केले आहे.
...तर कनिष्ठ महाविद्यालये, विद्यार्थ्यांना दंड
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेत माहिती तंत्रज्ञान (आयटी) विषयाच्या ऑनलाइन परीक्षेकरिता प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी प्रविष्ट करणाऱ्या शाळांना किंवा कनिष्ठ महाविद्यालयांना दंड भरावा लागणार आहे.
शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागाने मंगळवारी यासंदर्भात एक पत्रक जारी केले. माहिती तंत्रज्ञान विषयाच्या परीक्षेसाठी एका तुकडीत ६० पेक्षा अधिक विद्यार्थी प्रविष्ट केले असल्यास संबंधित विद्यार्थ्याला पाचशे रुपये दंड, तर कनिष्ठ महाविद्यालयांना प्रतिविद्यार्थी १,००० रुपये दंड भरावा लागणार आहे. परीक्षेच्या आधी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांकडून शिक्षण मंडळाकडे तपशीलवार माहिती पाठवली जाते.
पालघरमध्ये भरारी पथकाने तपासणी केली असता, एक डमी उमेदवार सापडला. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंदवलेला आहे. तर मंगळवारी घाटकोपरमधील एस. व्ही. के सार्वजनिक हायस्कूलमध्ये सेक्रेटरिएल प्रॅक्टिस परीक्षेवेळी एका विद्यार्थ्याला कॉपी करतांना पकडले आहे. नियम तोडल्यास कठोर कारवाई केली जाईल.
राजेंद्र अहिरे, अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ, मुंबई विभाग