लंडन, न्यूयॉर्कनंतर मुंबईही आता २ विमानतळांचे शहर; दोन लाख रोजगार निर्मितीची अपेक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 08:10 IST2025-10-06T08:10:22+5:302025-10-06T08:10:38+5:30
दरवर्षी २ कोटी प्रवासी वाहतूक क्षमता

लंडन, न्यूयॉर्कनंतर मुंबईही आता २ विमानतळांचे शहर; दोन लाख रोजगार निर्मितीची अपेक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे दोन लाखांहून अधिक रोजगारनिर्मिती होणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पामुळे दुहेरी विमानतळ असलेल्या ‘लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क, टोकिओ’ सारख्या जागतिक दर्जाच्या शहरांच्या यादीत मुंबईचा समावेश होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबर रोजी विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे.
नवी मुंबई विमानतळाच्या पहिल्या टप्प्यात एक धावपट्टी आणि एक टर्मिनलसह दरवर्षी २ कोटी प्रवासी वाहतुकीची क्षमता आहे. १,१६० हेक्टर क्षेत्रावर उभारलेला हा अत्याधुनिक प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारीतून उभारला जात आहे. त्यात अदानी एअरपोर्ट होल्डिंग्सचा ७४ टक्के, तर सिडकोचा २६ टक्के सहभाग आहे. प्रकल्पामुळे विमान वाहतूक, लॉजिस्टिक, आयटी, आदरातिथ्य व रिअल इस्टेटसह विविध क्षेत्रांत दोन लाखांहून अधिक रोजगार निर्माण होतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.
विमान वाहतूक क्षेत्रात अशी प्रगती
भारताचा विमान वाहतूक क्षेत्रात वेगाने विस्तार होत आहे. २०१४ मध्ये देशात ७४ विमानतळ कार्यरत होते, तर २०२५ पर्यंत ही संख्या १६३वर पोहोचली आहे.
२०३०पर्यंत प्रवासी वाहतूक दुपटीने वाढून ५०कोटींवर, तर कार्गो वाहतूक तिप्पट वाढून १ कोटी टनावर जाण्याचा अंदाज आहे.
हवाई वाहतुकीत आघाडी
आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या परिषदेवर भारत १९४४ सालापासून प्रतिनिधित्व करीत आहे. केंद्र सरकारच्या कायदे सुधारणा, प्रचंड पायाभूत सुविधा विस्तार आणि सुरक्षित, शाश्वत व सर्वसमावेशक वाढीच्या धोरणामुळे भारत जागतिक विमान वाहतूक बाजारात एक आघाडीचा देश म्हणून उदयास येत असल्याचा दावा नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने केला आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर
विमानतळाच्या पहिल्या टप्प्यात एक टर्मिनल आणि एका धावपट्टीसह दरवर्षी २ कोटी प्रवासी हाताळण्याची क्षमता असेल. पुढील काळात चार टर्मिनल्स आणि दोन धावपट्ट्यांमुळे ही क्षमता १५.५ कोटी प्रवासीपर्यंत वाढणार आहे. त्याचप्रमाणे मालवाहतुकीच्या क्षेत्रात ०.५ दशलक्ष टनांवरून ३२ लाख टन माल हाताळण्याची क्षमता असणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ऑटोमेटेड कार्गो टर्मिनल हे या विमानतळाचे वेगळे वैशिष्ट्य ठरणार आहे.