Join us  

Breaking : खडसेंनंतर आता खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2020 6:53 PM

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीने ही नोटीस बजावल्याची माहिती मिळत आहे. त्यानुसार येत्या 29 डिसेंबरला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याचे समजते

ठळक मुद्देआता, पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांनाही ईडीने नोटीस बजावल्याची माहिती मिळत आहे. त्यानुसार येत्या 29 डिसेंबरला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याचे समजते.

मुंबई - राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना दोन दिवसांपूर्वीच ईडीने नोटीस बजावली होती. त्यानंतर, आता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावल्याची प्राथमिक माहिती आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र, यासंदर्भात आपणास काही कल्पना नाही, असे संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना सांगितले.  

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंना दोन दिवसांपूर्वीच ईडीकडून नोटीस मिळाली आहे. यासंदर्भात खडसेंनी कबुली दिली असून बुधवारी आपण चौकशीला हजर राहणार असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे. आता, पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांनाही ईडीने नोटीस बजावल्याची माहिती मिळत आहे. त्यानुसार येत्या 29 डिसेंबरला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याचे समजते. मात्र, मला याची काहीही कल्पना नाही. जर घरी नोटीस आली असेल, तर मी स्वत: याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती देतो, असेही संजय राऊत यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलंय. 

खडसे बुधवारी हजर होणार

भोसरी येथील भूखंड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय(ईडी)कडून शनिवारी आपल्याला नोटीस प्राप्त झाली आहे. ३० डिसेंबरला मुंबईतील ईडी कार्यालयात बोलाविण्यात आले असून चौकशीत आपण सर्व सहकार्य करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शनिवारी माध्यमांना दिली. या प्रकरणात ही पाचवी चौकशी असल्याचे त्यांनी सांगितले. भोसरी येथील भूखंड हा पत्नी मंदाकिनी यांनी खरेदी केला असून एकत्रित कुटुंब म्हणून कदाचित माझ्या नावाने ही नोटीस आली असेल, असेही खडसे म्हणाले. 

प्रताप सरनाईक यांनाही नोटीस

गेल्याच महिन्यात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीने नोटीस पाठविली होती. यानंतर त्यांच्या घरीदेखील छापे मारले होते. यामुळे आधीच केंद्र विरोधात राज्य सरकार असा कलगीतुरा रंगलेला असताना शुक्रवारी रात्री खडसेंना ईडीने नोटीस पाठविल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. यानंतर आता पुन्हा भाजपा विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी असा वाद रंगला आहे.

राजकीय वर्तुळात खळबळ 

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने केलेल्या छापेमारीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून येत्या काही दिवसांमध्ये आणखी काही सेना नेत्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि राज्यातील उर्वरित भागात राजकीयदृष्ट्या कार्यरत असलेल्या पण विविध व्यवसायांत शेकडो कोटींची उलाढाल असलेल्या या नेत्यांच्या व्यवहारांची छाननी करण्यात येत आहे. त्यातील संशयास्पद आर्थिक व्यवहार असलेल्यांची चौकशी केली जाणार आहे, असे ईडीतील वरिष्ठ सूत्राकडून सांगण्यात आले. 

टॅग्स :शिवसेनासंजय राऊतअंमलबजावणी संचालनालयएकनाथ खडसे