Join us
Daily Top 2Weekly Top 5

जोरदार पावसानंतर मुंबईकरांना उन्हाचे चटके

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 06:56 IST

उत्तर कोकणासह उत्तर मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा । ‘महा’ चक्रीवादळ गुजरातला धडकणार

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात शुक्रवारी कोसळलेल्या मुसळधार पावसानंतर शनिवारी दिवसभर कडाक्याचे ऊन पडले होते. परिणामी, पावसाळ्यानंतर उन्हाळ्याची प्रचिती मुंबईकरांना येत असतानाच दुसरीकडे ‘महा’ हे चक्रीवादळ येत्या ४८ तासांत दक्षिण गुजरात किनारपट्टीकडे वळण्याची शक्यता आहे. परिणामी, गुजरातमध्ये कोसळधारेची शक्यता असतानाच ६ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत उत्तर कोकणासह उत्तर मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी मुसळधार सरी कोसळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पूर्व-मध्य अरबी समुद्रावर घोंगावत असलेले ‘महा’ हे चक्रीवादळ येत्या ४८ तासांत दक्षिण गुजरात किनारपट्टीकडे वळण्याची शक्यता आहे. तर पश्चिम मध्य अरबी समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र येत्या २४ तासांत सोमालिया किनारपट्टीकडे वाटचाल करून पुढे त्याची तीव्रता कमी होईल. गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रात जोरदार तर कोकण, गोवा, मराठवाड्यात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. गोव्यासह संपूर्ण राज्यात अनेक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे.मराठवाड्याच्या काही भागात, विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.ताशी ९० ते १०० किलोमीटर वेगाने वाहणार वारेहवामानातील बदलामुळे ५ नोव्हेंबरच्या आसपास वारे ताशी १७५ किलोमीटर या वेगाने वाहतील. अरबी समुद्र खवळलेला राहील. परिणामी, ७ नोव्हेंबरपर्यंत मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात उतरू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.राज्यासाठी अंदाज३ नोव्हेंबर : विदर्भात काही ठिकाणी तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.४ नोव्हेंबर : गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.५ नोव्हेंबर : मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, कोकण, गोव्यात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. विदर्भात हवामान कोरडे राहील.६ नोव्हेंबर : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल. विदर्भात हवामान कोरडे राहील.क़ज

टॅग्स :पाऊससमर स्पेशल