Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंडे, कोकाटे यांच्यानंतर आता आणखी एक मंत्री अडचणीत; विरोधकांनी केला मोठा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 06:37 IST

आता संबंधित महिलेला जानेवारी महिन्यात निनावी धमकीचे पत्र आल्यामुळे तिने पुन्हा आरोप करत कारवाईची मागणी केली आहे. याप्रकरणी या महिलेने राज्यपालांना पत्र लिहून १७ मार्चपासून विधान भवनासमोर उपोषण करणार असल्याचा इशाराही दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर विरोधकांनी महायुती सरकारमधील भाजपचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना टार्गेट केले आहे. गोरे यांनी एका महिलेला आपले विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप उद्धवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे, तर काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नाव न घेता हाच आरोप केला आहे. मंत्री गोरे यांनी हे आरोप फेटाळत, याप्रकरणी कोर्टाने आपली निर्दोष मुक्तता केल्याचा खुलासा केला आहे. 

राऊत याबाबत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत लाडके मंत्री जयकुमार गोरे यांच्याबाबत गंभीर प्रकार समोर येत आहेत. शिवकाळातील सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्याने कसा छळ आणि विनयभंग केला आहे, यासंदर्भातील माहिती समोर आली आहे. ती अबला महिला विधानभवनासमोर उपोषणाला बसणार आहे. संजय राठोड तुमच्या मंत्रिमंडळात आहेत. आता हे नवीन पात्र निर्माण झाले आहे. फडणवीसांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील ही सर्व रत्ने एकदा तपासली पाहिजेत, गोरेंसारखे विकृत मंत्री राज्य मंत्रिमंडळात आहेत, असा आरोप राऊत यांनी केला आहे.

वडेट्टीवार कोणाचेही नाव न घेता म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील एक मंत्री आहे, जो पैलवान आहे, त्याने एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवले, याप्रकरणी शिक्षा झाली तरी दहा हजार रुपये दंड भरून माफी मागतो आणि पुन्हा त्या महिलेच्या पाठी लागतो. त्या महिलेला ब्लॅकमेल केले जाते. जर भाजप मंत्र्यांचे हे वर्तन असेल तर राज्यातील महिला सुरक्षित कशा असतील? असा सवाल त्यांनी केला.

‘आरोप वस्तुस्थितीला धरून नाही अब्रुनुकसानीचा दावा करणार’

याबाबत खुलासा करताना मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, माझ्याबाबत विरोधकांनी जे आरोप केले ते वस्तुस्थितीला धरून नाहीत. विरोधक ज्या प्रकरणावरून माझ्यावर आरोप करत आहेत, त्यात कोर्टाने माझी निर्दोष मुक्तता केली आहे. देशात सर्वोच्च व्यवस्था ही न्यायव्यवस्था आहे. त्यामुळे विरोधक काय म्हणतात, याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ज्यांनी माझ्यावर आरोप केले, त्यांच्यावर हक्कभंग आणि अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचा इशारा गोरे यांनी दिला आहे. 

ज्या घटनेबाबत विरोधक बोलत आहेत ती घटना २०१७ साली घडली, त्यावर २०१९मध्ये कोर्टाने निकाल दिला आहे. कोर्टाच्या निकालाला ६ वर्षे झाली. आपण हा विषय कधी आणावा, कुठल्या वेळी काय बोलावे, यावर राजकीय लोकांनी काही मर्यादा ठेवली पाहिजे, असेही गोरे म्हणाले.  

काय आहे नेमके प्रकरण? 

काँग्रेसमध्ये असताना जयकुमार गोरे यांनी एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवले होते. त्यावेळी गोरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर अटक टाळण्यासाठी गोरे यांनी सातारा जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर गोरे यांना अटक होऊन दहा दिवसांसाठी तुरुंगात रवानगीही झाली होती. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला होता.

१७ मार्चपासून उपोषण महिलेचा इशारा  

आता संबंधित महिलेला जानेवारी महिन्यात निनावी धमकीचे पत्र आल्यामुळे तिने पुन्हा गोरे यांच्यावर आरोप करत कारवाईची मागणी केली आहे. याप्रकरणी या महिलेने राज्यपालांना पत्र लिहून मंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात १७ मार्चपासून विधान भवनासमोर उपोषण करणार असल्याचा इशाराही दिला आहे.

 

टॅग्स :राज्य सरकारमंत्रालयजयकुमार गोरे