Join us  

अजित दादांच्या शपथविधी पाहिल्यानंतर शरद पवारांचा पहिला फोन 'या' नेत्याला 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2019 11:18 AM

महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यात सिंहाचा वाटा हा शरद पवारांचा राहिला आहे.

मुंबई - महाराष्ट्रातील सत्तांतराच्या घडामोडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि संजय राऊत यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत आम्हाला अन्य पर्याय खुले आहेत असं सांगत भाजपाला गर्भित इशारा दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना आग्रही राहिली. शिवसेनेकडून संजय राऊत यांनी वारंवार भाजपावर निशाणा साधला. तर, दुसरीकडे शरद पवार यांच्याही संपर्कात ते होते. अखेर, या दोन्ही नेत्यांच्या संवाद-भेटींमधून शिवसेनेनं काँग्रेस आघाडीच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केलं. 

महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यात सिंहाचा वाटा हा शरद पवारांचा राहिला आहे. काँग्रेस नेत्यांची समजूत आणि मनधरणीचं मोठ काम त्यांनी केलं. तर, संजय राऊत यांनी शिवसेनेकडून भूमिका मांडली भाजपा नेत्यांवर राऊतांनी आक्रमकरित्या केलेल्या टीकेने भाजपा नेतेही संतापले होते. संजय राऊत यांच्या या आक्रमक अन् धाडसी भूमिकेमागे एक व्यक्तीवरील विश्वास होता, तो म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तेव्हाही त्यांना पूर्णपणे शरद पवारांवर विश्वास होता. आता, पवारांनीही या विश्वासाचा दाखला दिलाय.

अजित पवारांचा शपथविधी पाहिल्यानंतर सर्वात पहिल्यांदा मी उद्धव ठाकरेंना फोन केला. त्यावेळी, तेही टीव्हीवर तोच शपथविधी सोहळा पाहत होते. मी त्यांना कॉल करुन म्हटलं, पाहताय ना... मग एन्जॉय करा.... असं म्हणत तेव्हाही आपण रिलॅक्स असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं होतं. त्यांनंतर, आता शरद पवारांनीही अजित पवारांच्या शपथविधी सोहळ्याची पुसटशीही कल्पना नसल्याचं स्पष्ट केलं. तसेच, अजित पवारांचा शपथविधी पाहिल्यानंतर मी पहिला फोन-कॉल उद्धव ठाकरेंना केल्याचं पवारांनी सांगितलं. लोकांमध्ये संभ्रम होता, माझ्या सांगण्यावरुनच अजित पवारांनी शपथ घेतली असं लोकांना वाटत होतं. पण, मला याची काहीही कल्पना नव्हती. मला सर्वात पहिल्यांदात घरातूनच फोन आला, तेव्हा मला समजलं. मला विश्वासच बसत नव्हता. मग, मी टिव्हीवर पाहिलं. त्यानंतर, मला खात्री झाली की, मी हे दुरूस्त करु शकतो. कारण, टीव्हीवर दिसणारे राष्ट्रवादीचे सर्व आमदार माझ्या शब्दात ऐकणारे होते. मला महाराष्ट्राला एक संदेश द्यायचा होता, त्यामुळे मी उद्धव ठाकरेंना पहिला फोन करुन याबाबतची खात्री पटवून दिली. तसेच, तुम्ही निश्चिंत राहा, जे आपलं ठरलंय त्याप्रमाणेच होईल, त्यात कसूभरही बदल होणार नाही, असा विश्वास त्यांना दिला. त्यानंतर, उद्धव ठाकरे आणि मी दोघांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत खुलासा केला, असे शरद पवार यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. 

दरम्यान, महाविकास आघाडीचं सरकार बनविण्यासाठी शरद पवार यांनाही खूप तडजोडी कराव्या लागल्या आहेत, काँग्रेस नेत्यांसोबत बैठका घ्याव्या लागल्या आहेत. पण, ते हे घडवणारच, असा मला विश्वास होता. महाराष्ट्राला बाळासाहेब ठाकरेंवर जेवढा विश्वास होता, तेवढाच विश्वास शरद पवारांवर आहे. बाळासाहेब यांच्या निधनानंतर शरद पवारांनी ती पोकळी भरून काढली का? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना, असू शकतं... असू शकतो... असं उत्तर संजय राऊत यांनी दिलं होतं. संजय राऊत यांनीही एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली, त्यावेळी महाविकास आघाडी आणि शरद पवार यांच्याबद्दल ते भरभरून बोलले होते.  

टॅग्स :मुंबईशरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसउद्धव ठाकरेशिवसेना